कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांत गुळास प्रतिक्विंटल ५१०० रुपयापर्यंत दर मिळाला. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, मुहूर्ताच्या सौद्यांत शेतकऱ्यांना कमीत कमी २८०० दर मिळाला.बाजार समितीत दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढले जातात. यंदा साताप्पा बुरगे यांच्या अडत दुकानात सकाळी नऊ वाजता सभापती कृष्णात पाटील व उपसभापती अमित कांबळे यांच्या हस्ते सौदा काढण्यात आला.
सभापती कृष्णात पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी वसविलेली गुळाची बाजारपेठ गुणवत्तापुर्ण व स्वच्छ गुळामुळे अधिक भक्कम झाली. देश व विदेशांत कोल्हापुरी गुळाने भुरळ घातली असून, याचे सगळे श्रेय शेतकरी, व्यापाऱ्यांना जाते. पण साखर कारखान्यांचा ऊसदर वाढत आहे.
गुळाचा उत्पादन खर्च व त्याला मिळणाऱ्या भावाची सांगड घालताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. आगामी काळात गुळाच्या दराचा प्रश्न महत्त्वाचा असून बाजार समिती चांगल्या दरासाठी प्रयत्नशील आहे.यावेळी संचालक विलास साठे, उत्तम धुमाळ, बाबूराव खोत, भगवान काटे, किरण पाटील, आनंदराव पाटील, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक, रामचंद्र खाडे, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार उपस्थित होते.