कोल्हापूर : प्रवासी हा केंद्रबिंदू ठेवूनच राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एखाद्या मार्गावर बंद पडल्यास तत्काळ त्या ठिकाणीच ती दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशा नव्या २५० ब्रेकडाउन व्हॅन येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.मंत्री रावते शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.रावते म्हणाले, प्रवाशांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी महामंडळाचे प्राधान्य राहिले आहे. प्रवासादरम्यान एखादी गाडी बंद पडल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक नव्या २५० ब्रेकडाउन व्हॅन घेण्यात येणार आहेत.
या व्हॅनमध्ये नेहमी चार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी गाडी बंद पडली आहे, तिथे तत्काळ ही व्हॅन जाऊन जागेवरच त्या गाडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री असणार आहे. प्रत्येक आगाराला एक व्हॅन देण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी कामगार व अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, महामंडळाचे यंत्र अभियंता एस. एस. कुलकर्णी, कामगार अधिकारी पी. यू. पाटील, विधि अधिकारी टी. वाय. साळोखे, सुरक्षा अधिकारी सुधीर भातमारे,सहायक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.
लवकरच वेतनवाढीची घोषणाकामगारांशी संवाद साधताना वेतन कराराबाबत मंत्री रावते यांना कामगारांनी विचारले असता, मंत्री रावते म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील लोकसभा व अन्य पोटनिवडणुकांकरिता आचारसंहिता जाहीर केली आहे.
त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर करता येणार नाही. तरीही एस. टी. प्रशासनाने तातडीने निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून प्रलंबित वेतनवाढ जाहीर करण्याला परवानगी देण्याबाबत विनंती केली. त्याला निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाली.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते परत आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये वेतनवाढीची घोषणा केली जाईल. वेतनवाढीसह कामगारांना विविध अनेक सोईसुविधा यावेळी जाहीर केल्या जाणार आहेत.
अधिकाराचा योग्य वापर कराबसस्थानकांच्या दोनशे मीटर परिसरात प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नाही. तरीही अनेक खासगी बस आणि अन्य वाहनेही रस्त्यांवर थांबून प्रवासी घेतात. त्यांच्यावर कडक करावाई करावी, तसेच गर्दीच्या काळात खासगी वाहनांची भाडेवाढ ही अनेकपट असते.
खासगी वाहनांना एस.टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशा सूचना मंत्री रावते यांनी आर. टी. ओ. आणि महामंडळाचे अधिकारी यांना दिल्या.