कोल्हापूर : गेले पाच दिवस गजबजलेल्या कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवामध्ये ४० लाख रुपयांची विक्री झाली. बुधवारी संध्याकाळी या महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी सर्वाधिक वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या समारोपासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले उपस्थित होते.प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, पाच दिवसांमध्ये एकूण ४० लाखांची विक्री झाली असून, २२ लाख रुपयांच्या वस्तू, तर १८ लाखांहून अधिक रकमेचे खाद्यपदार्थ विकले गेले आहेत. यातूनच महिला बचत गटातील महिलांचे कौशल्य दिसून येते.
यावेळी अहिल्यादेवी बचत गट अब्दुललाट, धनसंपदा गट, नूल; आयन गट, वाकरे; गुरुदेव गट, धामोड; आयेशा गट, चिंचवाड यांचा सर्वाधिक वस्तूविक्रीबद्दल गौरव करण्यात आला; तर गुरुदत्त आसुर्ले-पोर्ले, गणेश गट- वाघवे, ताजकृष्ण गट- कळंबा आणि विनायकी गट, कोल्हापूर यांचा सर्वाधिक खाद्यपदार्थ विक्री केल्याबद्दल गौरव करण्यात आला.यावेळी करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, हातकणगंलेचे माजी सभापती रेश्मा सनदी, प्रायव्हेट हायस्कूलचे कार्यवाह बी. जी. देशपांडे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांची भाषणे झाली.
करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांनी आभार मानले; तर सचिन पानारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रायव्हेट हायस्कूलच्या सहकार्यवाह एस. एस. कुलकर्णी, खजिनदार ए. व्ही. कुंभार, ज्योती पाटील, अमृता कुंभार, राजेंद्र जाधव, सम्राट पोतदार, आदी उपस्थित होते.
दोन लाखांची बिर्याणी फस्तया पाच दिवसांच्या महोत्सवामध्ये २ लाख ९ हजार रुपयांची एकाच स्टॉलवरची हैदराबादी बिर्याणी खवय्यांनी फस्त केली आहे; तर वस्तूविक्रीमध्ये सर्वाधिक विक्री चटण्यांची झाली असून, अडीच लाख रुपयांची चटणी एकाच स्टॉलवरून विकली गेली आहे.