- उद्धव गोडसेकोल्हापूर - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीपुरीतील प्रकाश हार्डवेअरमधून गोवा बनावटीच्या महागड्या दारूची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी (दि. १०) रात्री छापा टाकून केलेल्या कारवाईत सुमारे साडेचार लाखांची दारू जप्त केली. हार्डवेअर मालक भारत भूपतराय मेहता (वय ५९, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले प्रकाश हार्डवेअर हे शहरातील प्रसिद्ध दुकान आहे. हार्डवेअर विक्रीची लाखोंची उलाढाल असतानाही याच दुकानातून गोवा बनावटीच्या दारूची छुपी विक्री सुरू होती. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल मंगेश माने यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलिसांना छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी, मंगेश माने, किशोर पवार यांनी प्रकाश हार्डवेअरची झडती घेतली. झडतीदरम्यान दुकानात गोवा बनावटीचा दारू साठा सापडला. पोलिसांनी चार लाख ३५ हजार ४१२ रुपयांची दारू जप्त केली. हार्डवेअर दुकानातूनच दारूची विक्री केली जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. कॉन्स्टेबल मंगेश माने यांच्या फिर्यादीनुसार हार्डवेअर मालक भारत मेहता याच्यावर गुन्हा दाखल झाला.