सुरज पाटीलहेरले: कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली फाटा ते अंकली फाट्यापर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चोकाक (ता. हातकंणगले) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गावर वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जणांना कायमस्वरूपी जायबंदी व्हावे लागले आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्या जाळला.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज, सकाळी ११ वाजता चोकाक जवळ कोल्हापूर-सांगली रस्ता अर्धा तासाहून अधिक काळ रोखून धरला. यावेळी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. येत्या गुरूवार पर्यंत सांगली- कोल्हापूर महामार्गावरील खड्डेमय रस्ता दुरूस्त न झाल्यास हातकणंगले येथे दिवसभर चक्काजाम करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी महामार्गाच्या अधिका-यांनी सदर रस्ता मुदतीत पुर्ण करण्याचे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, स्वस्तिक पाटील, आप्पा एडके, राजेश पाटील, मुनिर जमादार, संदीप कारंडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोल्हापूर-सांगली महामार्ग खड्डेमय, स्वाभिमानीने ठेकेदार व प्रकल्प संचालकांचा प्रतिकात्मक पुतळ्या जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 4:24 PM