कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजालगत असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाली असून त्यांतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नागरिक व भाविकांची गैरसोय व्हायला लागली आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येत्या शुक्रवार (दि. १३) पर्यंत स्वच्छतागृह दुरुस्त होऊन पूर्ववत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गेल्या आठ दिवसांपासून अंबाबाई मंदिर परिसरातील जोतिबा रोड येथे असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे नादुरुस्त झाली आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपला गळती असल्यामुळे सांडपाणी वारंवार रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे स्वच्छतागृह बंद करण्यात आले.
परिसरातील नागरिकांनी तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागात फोन करून याची माहिती दिली. मात्र पाहणी करण्यापलीकडे कोणतीही उपाययोजना झालेली नाही. पावसामुळे सांडपाणी वाहत रस्त्यावर येत आहे. याच मार्गावरून अंबाबाई तसेच जोतिबा मंदिरात जावे लागत आहे. तसेच बाहेरगावच्या भाविक आणि स्थानिक व्यापाºयांनाही जवळपास मुतारी नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.अंबाबाई मंदिर परिसर हा तीन प्रभागांतील नगरसेवकांच्या अखत्यारीत येत असून कोणालाही याचे गांभीर्य नाही, असे वारंवार दिसत आहे. याबद्दलही बजरंग दलाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुंबलेल्या व रस्त्यावर वाहणाऱ्या या स्वच्छतागृहाची पोस्ट कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकली असून, येत्या शुक्रवार (दि. १३) पर्यंत सदर स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्त करावी अन्यथा तेथील मूत्र आणि साठलेला कचरा महापालिकेत येऊन आरोग्यधिकाºयांच्या खुर्चीवर टाकला जाईल, असा इशारा बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे व शहरप्रमुख महेश उरसाल यांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांनी घेतली दखलसोशल मीडियावर या मुतारीबाबत पोस्ट पडताच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची तातडीने दखल घेतली. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर तेथील चोकअप काढून अॅसिड वॉश करून देण्यात आले. स्वच्छतागृहातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपला गळती असल्याने ही पाईप बदलण्याचे काम विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
स्वच्छतागृहाअभावी गैरसोय
अंबाबाई मंदिराच्या परिसरात जोतिबा रोड आणि विद्यापीठ हायस्कूलसमोर अशा दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. ती चार-चार सीटची आहेत. नादुरुस्तीमुळे त्यांची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. मंदिरात जाताना व बाहेर पडताना भाविकांना नाक मुठीत घेऊनच जावे लागते; कारण या परिसरात दुर्गंधीच अधिक पसरलेली असते. तिच्या स्वच्छतेकडेही सतत दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते.