कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शनसाठी २१ हजारपर्यंत असणारी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून ती ५० हजारपर्यंत करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) तर्फे मंगळवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.दुपारी एकच्या सुमारास जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयासमोर एकत्र आले. या ठिकाणी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात तीव्र निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. यानंतर मागण्यांचे निवेदन करवीरचे पुरवठा अधिकारी आदित्य दाभाडे यांना सादर केले.निवेदनातील मागण्या अशा, शासनाने रेशनकार्डवरील धान्य वितरण बंद करून अनुदान देण्याचे धोरण जाहीर केले आहे. ते रद्द करून पूर्वीप्रमाणेच धान्य द्यावे. रेशनकार्डवर दर महिन्याला मिळणारे रॉकेल पूर्वीप्रमाणे विनाअट ५ लिटर द्यावे, सांगरुळ (ता. करवीर) येथील दलित समाजाला शासनाकडून मिळालेली गट नं.२३९१ ही जमीन त्यांच्या ताब्यात द्यावी. तसेच येथील स्मशानभूमी गट नं.५६५ या जमिनीवरील सातबारा पत्रकी दलित समाजाची नोंद करण्यात यावी. रमाई घरकुल योजनेमधील अनुदानाची रक्कम १ लाख २ हजारवरून २ लाख ५० हजारपर्यंत करण्यात यावी. आंदोलनात भाऊसाहेब काळे, पी. एस. कांबळे, विलास कांबळे, बबन शिंदे, आदी सहभागी झाले होते.