कोल्हापूर : जवाहनगर परिसरातील सरनाईक वसाहत, जमादार कॉलनी आणि सासने कॉलनीमधील नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरियाची भीती पसरली आहे. दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठ्यामुळे या परिसरात ताप, उलटीचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याचे येथील नागरिकांनी सोमवारी सांगितले.या परिसरात सुमारे चार हजार कुटुंबे राहतात. गेल्या महिन्यापासून येथील काही लहान मुले, महिला, पुरुषांना ताप, उलटीचा त्रास सुरू झाला. या स्वरूपातील सुमारे शंभर रुग्ण खासगी, सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाल्याची भीती येथे पसरली आहे.
कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरातील सरनाईक वसाहतीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. (छाया : नसीर अत्तार)गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला सांडपाण्यासारखा वास येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत त्यांनी नगरसेविका वहिदा सौदागर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली.
आरोग्य विभागाने या परिसरातील नागरिकांना पाण्यामध्ये टाकण्यासाठी औषधे दिली. फ्रीजची पाहणी केली. रस्त्यांची साफसफाई केली. मात्र, तरीही ताप, उलटीचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महानगरपालिकेने या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
घरोघरी पाहणी करणारसरनाईक वसाहत, जमादार कॉलनी आणि सासने कॉलनी परिसरातील ताप, उलटीच्या रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही केली. या परिसरातील रस्ते, बाजूपट्ट्यांची साफसफाई केली. घरातील साठविलेल्या पाण्यामध्ये औषध टाकले. त्यासह घरांमध्ये सर्व्हे केला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सर्व्हेचा अहवाल शासकीय रुग्णालयाला पाठविला. रुग्णालयाकडून आलेल्या अहवालात डेंग्यूचा एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य निरीक्षकांना घरोघरी जावून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तळघरांमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा करणे अथवा त्यामध्ये गप्पी मासे सोडणे. धूर फवारणी करणे आदी स्वरूपातील मोहीम राबविली जाणार आहे.
गेल्या १५ दिवसांपासून आमच्या वसाहतीमध्ये दूषित, अळ्यामिश्रित पाणी येत आहे. त्याला गटर्ससारखा वास आहे. त्याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे. शुद्ध पाणीपुरवठा करावा.- अख्तरबी शेख,सरनाईक वसाहत, दुसरी गल्ली
ताप, उलटीचे रुग्ण वाढत असल्याने नागरिक घाबरले आहेत. या स्वरूपातील रुग्ण वाढण्याचे नेमके कारण काय? आहे याचा शोध घेऊन महानगरपालिकेने त्वरीत कार्यवाही करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.-जुबेर शेख, मस्जिद गल्ली