कोल्हापूर : माहेरहून पैसे आणावेत म्हणून पत्नी व सासू-सासऱ्याला घरात जाऊन पिस्टलचा धाक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांवर येथील राजारामपुरी पोलिसात बुधवारी (दि. ५) गुन्हा दाखल झाला.ही घटना मंगळवारी (दि.४) कोल्हापूरातील टाकाळा येथे घडली. याबाबतची फिर्याद शिरीन सैफुल खान (वय २५, मूळ रा. प्लॅट नंबर ३, सरोज अपार्टमेंट, डायमंड बेकरी लेन, फातिमानगर, पुणे) यांनी दिली.
सैफुल मोहम्मद रफी खान, निलोफर मोहम्मद रफी खान, मोहम्मद रफी चाँदसाब रफी खान व मोहसिन रफी खान (सर्व रा. फातिमानगर, पुणे) अशी गुन्हा दाखल संशयितांची नांवे आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिरिन खान यांचे माहेर कोल्हापूरातील टाकाळामधील माळी कॉलनी येथे आहे. सध्या याठिकाणी त्या राहतात. त्यांचा पुणे येथील सैफुल खान यांच्याशी विवाह झाला आहे.
माहेरहून पैसे घेऊन ये नाहीतर माहेरच्यांना ठार मारु, अशी शिरीन यांना धमकी देत संशयितांनी ‘तुझे नांव सुद्धा खराब करेन’ असे धमकालवे. तसेच मानसिक व शारिरिक त्रास देऊन जाचहाट करुन तिला उपाशापोटी ठेवले. त्यानंतर तिला घराबाहेर हाकलून दिले.शिरिन या मंगळवारी (दि.४) माहेरी टाकाळा येथे घरी असताना संशयित सैफुल खान रात्री घरी आला. त्याने चारचाकी वाहनातून पत्नी शिरिनला या परिसरातील एका बागेजवळ नेले. वाहनामध्ये पिस्टलचा धाक दाखवून ‘तु तुझे माहेरी पैशाचे का बोलली नाहीस’असे म्हणून तिच्या कानशीलात लगावली. त्यानंतर पुन्हा तिला सैफुल घरी सोडण्यासाठी गेला.
‘आत्ताच्या आता पैसे पाहिजेत, नाहीतर , तुमच्या मुलीला आणि तुम्हाला सोडणार नाही’ असे म्हणून शिरीन, तिचे आई-वडिल यांना पिस्टल दाखवून सैफुलने घरात धमकावले. त्यानंतर तो निघून गेला.
२० एप्रिल ते २१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत शिरिनने जाचहाट केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुरुवारी पर्यंत कोणास अटक केली नव्हती. याचा तपास तपास पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील करीत आहेत.