कोल्हापूर : ‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊवर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.बिचकुले (ता. कोरेगाव, सातारा) येथील अंशुल या नऊवर्षीय बालकाने वडील प्रशांत पवार यांच्या साहाय्याने, आपल्या दुष्काळी भागात पाण्याच्या थेंबाथेंबासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी ‘पाणी फौंडेशन’ने सुरू केलेल्या लोक चळवळीतही गावकऱ्यांचा सहभाग आहे.
सध्या ज्या भागात विपुल पाणी आहे, अशा भागात पाणी जपून व काटकसरीने वापरण्यासाठी व त्याची नासाडी टाळण्याच्या उद्देशाने, सायकलवरून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तो सातारामार्गे बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला.
याबाबत त्याने प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ सहलीत सहभागी झालेल्या मुला-मुलींशी पाणी, दुष्काळ व पर्यावरण या विषयांवर संवाद साधला. यावेळी अन्य बालमित्रांनी बालदिनाच्या एकमेकांना व त्यालाही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले उपस्थित होते.