कोल्हापूर : नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णपणे वाफेवर गूळ निर्मिती केल्यास खर्च, श्रम आणि इंधनाची बचत होते. त्यामुळे हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या व्हीलेज इंडस्ट्रीयल पॉवर कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कार्ल बिलेनबर्ग यांनी गुरुवारी येथे केले.शाहू मार्केट यार्ड येथील छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी-विक्री संघातर्फे संघाच्या हॉल येथे आयोजित नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्णत: वाफेवर गूळ निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक महावीर जंगटे, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ ज्योतिकुमार पाटील, पश्चिम महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदींची होती.बिलेनबर्ग म्हणाले, साखर कारखान्यात बगॅस जाळून वाफ तयार करून रस उकळला जातो. यासाठी जे काही इंधन जळते व त्यातून मिळणाऱ्या वाफेतून एकाचवेळी एकापेक्षा अधिक काहिलींना ही ऊर्जा मिळते. त्याच पद्धतीने वाफेवर गूळ निर्मिती करण्याची पद्धत आहे. यामुळे वेळ, श्रम, इंधनाची बचत होते. यापूर्वी केनियामध्ये या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वाफेवर आंब्याच्या रस गरम करून उत्पादन तयार करण्यात आले आहे.
महाराष्ट्रत उसाचे उत्पादन जादा आहे. त्यामध्ये अजूनही गूळनिर्मितीकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याने त्यांना या नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी प्रसार केला जात आहे. या नवतंत्रज्ञानासाठी देशातील मुख्य केंद्र हे पुण्यातील उरळी कांचन येथे करण्यात येणार आहे.महावीर जंगटे म्हणाले, सेंद्रीय गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. खर्च व मनुष्यबळ कमी लागत असल्याने वाफेवर गूळ निर्मितीच्या नवतंत्रज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर होईल. त्याचबरोबर राज्य सरकारने नवीन कृषी उद्योगांसाठी ‘मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना’ आणली आहे. त्यामध्ये गुळाचाही समावेश करण्यात आला आहे.राजाराम पाटील यांनी वाफेवर गूळनिर्मितीच्या तंत्रज्ञानाचा कोल्हापूरात प्रकल्प करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सेंद्रीय घटक वापरून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीनुसार गूळनिर्मिती केल्याबद्दल तुगरी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील कैलास पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.