कोल्हापूर : महानगरपालिकेच्या एकमेव शाहूंच्या नावे असलेल्या गंगावेशीतील शाहू उद्यानाचा फलकच गायब झाला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘शाहू उद्यानचा महापलिकेला विसर’ अशी बातमी मंगळवारी (दि.२६) प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेत भाजप ओबीसी महिला आघाडीतर्फे उद्यानाचा फलक लावून सामजिक बांधीलकी जपली.बुधवारी वटपौर्णिमेनिमित्त ‘भाजप ओबीसी महिला आघाडी’च्या महिला शाहू उद्यानात असलेल्या वडाची पूजेसाठी एकत्र जमल्या. तिथे आल्यानंतर त्यांनी ‘शाहूंच्या नावाने फलक लावण्याचा’ संकल्प केला. तो तत्काळ अंमलात आणत या सावित्रींनी शाहूंचा वसा जपला.गंगावेसमधील शाहू उद्यानात गुरुवारी सकाळी अकरा वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.यावेळी महेश जाधव म्हणाले, शाहूंच्या नावाने असणाऱ्या या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे त्वरित लक्ष द्यावे. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी लागणारी मदत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून केली जाईल.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप कुंभार, भाजप ओबीसी मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष राजू कुंभार, आकाश चिखलकर, लखन निगवेकर, रवी चिले,दिलीप पालकर, आदित्य माजगावंकर, तानाजी वडर, अभी पोवार, दीपक गावडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी भागातील नागरिकांसह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी शाहू उद्यानात सर्वजणी पूजेसाठी एकत्र जमल्यानंतर शाहू उद्यानाच्या सद्य:स्थितीची चर्चा झाली व सर्वानुमते आम्ही शाहूंच्या नावाचा फलक लावण्याचा निर्णय घेतला. आज तो प्रत्यक्षात साकारला.- विद्या बनछोडे, अध्यक्षा भाजप ओबीसी महिला मोर्चा
या साविंत्रींनी जपला शाहूंचा वसाचिनार गाताडे, छाया शिंदे, विद्या बागडी, सविता पाडळकर, राजश्री कोळेकर, श्रद्धा मेस्त्री, सोनल शिंदे, समिना मस्तनावाले, वर्षा कुंभार