कोल्हापूर : पाचवी ते नववीचा माध्यमिक शाळेतील निकाल मंगळवारी (१ मे) रोजी नेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेमध्ये मोठी गर्दी केल्याने, गेल्या पंधरा दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या शाळा पुन्हा गजबजून गेल्या.सकाळी आठ वाजल्यापासून निकाल नेण्यासाठी पालकांची शाळेच्या परिसरात गर्दी होऊ लागली होती. अपेक्षेप्रमाणे काहींना यश मिळाल्याने चेहरे फुलले होते; तर कमी गुण मिळाल्याने काहींचे थोडे हिरमुसलेले दिसले. पाल्यांसह पालकांनाही निकालाची उत्सुकता असल्याने मोठी गर्दी झाली होती.
काही विद्यार्थी बाहेरगावी गेल्याने त्यांचा निकाल पालकांनी घेतला. अपेक्षित गुण मिळालेले पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. प्रत्येक शाळेतील पाचवी ते नववीच्या वर्गातील निकाल असल्याने शाळेचा परिसर सकाळपासून गजबजून गेला होता.निकाल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना नातेवाईक, मित्रमंडळी किती टक्के पडले, कितवीत गेलास, असे प्रश्न हमखास विचारत होती. पालक आपल्या जवळच्या नातेवाइकांना पाल्याच्या निकालाची बातमी मोबाईलवरून देत होते. अशा आनंदी वातावरणात निकालाचा दिवस पार पडला. निकालानंतर काही पाल्यांनी मामांच्या गावाचे नियोजन केले; तर काहींनी पालकांसोबत सहलीला जाण्याचे नियोजन केले.
५ मे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील १ ते ७ प्राथमिक शाळांतील निकाल जाहीर होणार.
१२ मे : कोल्हापूर शहरातील सर्व खासगी प्राथमिक शाळा व महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल जाहीर होणार.१५ जून : शाळा सुरू होणार