कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत साजरा होणाऱ्या तिसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचा पडदा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सागर तळाशीकर यांच्या हस्ते होणार असून महानगरपालिकेच्या सर्व ६0 शाळा सहभागी होणार आहेत. यंदा बाल चित्रपट महोत्सवाचे शताब्दी वर्ष आहे.
चिल्लर पार्टीच्या वतीने महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तोमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरुक पालकांची मुलं या उपक्रमाला उपस्थित असतात, परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा कुटुंबातील मुलांपर्यंत बालचित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे महोत्सवाचे आयोजन करते. यंदा केवळ महानगरपालिकेच्या ६0 शाळांमधील विद्यार्थीच या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवातील सहा चित्रपटांचा आस्वाद घेणार आहेत.या महोत्सवाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९. ३0 वाजता शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूरचे सुपुत्र अभिनेते सागर तळाशीकर यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण सभापती वनिता देठे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.बालचित्रपटाचे शताब्दी वर्ष१९१८ मध्ये रशियात गार्लिन या रशियन कथाकाराच्या कथेवर आधारित ' सिग्नल ' हा जगातील पहिला बालचित्रपट प्रदर्शित झाला. २0१८ हे वर्ष बाल चित्रपटाचे शताब्दी वर्ष आहे, म्हणूनही या महोत्सवाला विशेष महत्व आहे.