लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना २०१६-१७ या आर्थिक वर्षात राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या माध्यमातून तब्बल ६१०५ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा औरंगाबाद पाठोपाठ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत किणिंगे यांचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड व जिल्हा बॅँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देते. कोल्हापूर जिल्ह्याला २०१६-१७ साठी ६०१४ कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये प्रामुख्याने कृषीसाठी तीन हजार कोटी, तर लघु उद्योगासाठी १९१२ कोटी, तर अन्य विभागांसाठी ११०१ कोटींचे उद्दिष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यातील बॅँकांनी या आर्थिक वर्षात तब्बल ६१०५ कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. पीक कर्जासाठी तीन हजार कोटींपैकी १९८५ कोटींचे प्राधान्याने वाटप करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड व जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांना २०८० कोटी पीक कर्जाचे वाटप केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले आहे. जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपातील काम पाहून राज्यस्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक शशिकांत किणिंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, रिझर्व्ह बॅँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक मौलिक, बॅँक आॅफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक पी. आर. मराठे, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मुद्रा लोन’ योजनेचे जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार ५८३ लाभार्थी आहेत. त्यांना ८८२ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. इतक्या प्रभावीपणे मुद्रा लोन योजना राबविणारा कोल्हापूर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील सर्वच बॅँकांनी पीक कर्ज वाटपात अतिशय प्रभावीपणे काम करून राज्यात ठसा उमटविला आहे. पीक कर्जाबरोबरच मुद्रा लोन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानातही उत्कृष्ट काम केले असून, ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. - शशिकांत किणिंगे (जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅँक) कोल्हापूरची हॅट्ट्रिक!इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करणाऱ्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. पीक कर्ज वाटपाचा सलग तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकून कोल्हापूरने हॅट्ट्रिक साधली आहे. जिल्ह्यातील एकूण व पात्र शेतकरीएकूण शेतकरी पीक कर्ज मागणी करणारेत्यातील अपात्रपात्रप्रत्यक्ष लाभ घेतलेले ७ लाख ९० हजार ८७९ ४ लाख ७४ हजार ७९७ ४० हजार ८४० ४ लाख ३३ हजार ९५७३ लाख ५३ हजार १७०
पीक कर्ज वाटपात ‘कोल्हापूर’ दुसरा
By admin | Published: June 06, 2017 1:12 AM