कोल्हापूर : निखिल कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे, संकेत साळोखे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर जिल्हा संघाचा ५-१ असा धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले.नाशिक येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने पहिल्या फेरीत बीड संघावर १४-० असा, तर दुसऱ्या फेरीत धुळे संघावर ५-१ व अमरावतीवर १-० आणि उपांत्य फेरीत ४-३ असा पुणे संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
नागपूर संघाबरोबर झालेल्या अंतिम फेरीत कोल्हापूर संघाने ५-१ अशा गोलफरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. यात ७ व्या मिनिटास कोल्हापूर संघाकडून सूरज शिंगटेने निखिल कुलकर्णीच्या पासवर गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नागपूर संघाला मिळालेल्या पेनल्टीद्वारे गोल करीत संघास १-१ अशी बरोबरी साधण्यात यश आले.
उत्तरार्धात के.एस.ए.कडून निखिल कुलकर्णी, सिद्धेश यादव, प्रथमेश हेरेकर, संकेत साळोखे यांनी गोल करीत संघाची ५-१ अशी भक्कम आघाडी निर्माण केली. ही आघाडी कायम ठेवत कोल्हापूर संघाने सामन्यासह दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले.
विशेष म्हणजे कोल्हापूर संघाकडून आकाश मेस्त्री याने उत्कृष्ट गोलरक्षण करीत संघास प्रोत्साहन दिले.बक्षीस वितरण वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव साऊटर वाझ, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.विजयी संघात आकाश मेस्त्री, निखिल कुलकर्णी, अनिकेत पोवार, अश्विन टाकळकर, सुनीत पाटील, सौरभ हारुगले, हरीष पाटील, सिद्धेश यादव, श्रेयस मोरे, सूरज शिंगटे, संकेत साळोखे, स्वराज्य नाईक, सोमेश पाडळकर, सुयश हांडे, शुभम जाधव, शाहू भोईटे, प्रतीक बदामे, प्रथमेश हेरेकर, पवन माळी, मसूद मुल्ला व मार्गदर्शक राजेंद्र घारगे, गजानन मनगुतकर यांचा समावेश होता.