कोल्हापूर : शिवसेना-भाजप युती झाली तर सोबत, नाही तर स्वतंत्र लढायचे आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सोमवारी येथे केले. याच कार्यक्रमात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा तरुणांची कामे न झाल्यास राष्ट्रीयकृत बॅँकांवर हल्लाबोल करू, प्रसंगी उपाध्यक्षपदही धुडकावू, असे उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले.कळंबा येथील अमृतसिद्धी हॉल येथे शिवसेनेतर्फे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय पवार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आ. चंद्रदीप नरके, आ. प्रकाश आबिटकर, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, तालुकाप्रमुख विराज पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शुभांगी पोवार, आदींची होती.यावेळी दुधवडकर यांच्या हस्ते पवार यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व कृष्णाची मूर्ती देऊन, तर ज्योत्स्ना संजय पवार यांचा नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.दुधवडकर म्हणाले, शिवसेनेत निष्ठेने केलेल्या कामाचे फळ पक्षाने संजय पवार यांना दिले आहे. त्यांनी या पदाच्या माध्यमातून तरुणांना न्याय द्यावा. यामध्ये बॅँका अडवणूक करत असतील, तर त्यांना धडा शिकवावा. संजय पवार म्हणाले, कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला हे पद मिळाले आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्य मराठा तरुणांसाठीच करणार आहोत. राष्ट्रीयकृत बॅँकांनी मराठा तरुणांची अडवणूक केल्यास हल्लाबोल करू, प्रसंगी या पदाला धुडकावून लावू, पण तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.महेश जाधव म्हणाले, शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या यादीत पवार यांचे नाव आहे. उशिरा का होईना, त्यांना न्याय मिळाला. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद मिळो. आ. नरके म्हणाले, यशापयशाने न खचता पक्ष वाढविण्याचे काम पवार यांनी निष्ठेने केले आहे. त्याची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी हे पद दिले. देवणे म्हणाले, आमदार खासदारकी मिळाली नाही म्हणून आम्ही नाराज न होता काम केले. आपल्याला कुठल्याही महामंडळाची अपेक्षा नाही, उलट जिल्हाप्रमुख हे पद आपल्यासाठी मोलाचे आहे. यावेळी सुजित चव्हाण, सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, आदी उपस्थित होेते.