कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडीत चार पैकी तीन सभापतीपदाच्या जागा जिंकत अपेक्षेप्रमाणे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले.ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयअंतर्गत प्रभाग समितीच्या सभापतीपदी अनपेक्षीतपणे ताराराणी आघाडीच्या राजसिंह शेळके विजयी झाले. दहा - दहा असे समान मतदान झाल्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय झाला. त्यात शेळके नशीबवान ठरले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन फुटीर तसेच शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी सत्ताधारी आघाडीला मतदान केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पिठासन अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी चारही प्रभाग समिती सभापतीपदांची निवडणुक पार पडली. सर्वच नगरसेवकांना या सभापती निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याच्या सुचना गटनेत्यांनी दिल्यामुळे शुक्रवारी नगरसेवकांची उपस्थिती शंभर टक्के होती.
प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ अशा क्रमाने या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत हात वर करुन सदस्यांनी मतदान केले. नियाजखान (शिवसेना), किरण शिराळे , सविता घोरपडे, तेजस्वीनी इंगवले (तिघेही ताराराणी आघाडी) असे चार नगरसेवक वैयक्तीक कारणांमुळे या निवडणुक प्रक्रीयेत भाग घेतला नाही. तसे त्यांनी पिठासन अधिकाऱ्यांना कळविले होते.गांधी मैदान प्रभाग समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसच्या प्रतिक्षा धिरज पाटील यांची सलग चौथ्यांदा निवड झाली. त्यांनी भाजपच्या ललिता उर्फ अश्विनी बारामते यांचा १४ विरुध्द ५ मतांनी पराभव केला.
शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माधवी प्रकाश गवंडी यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या सुनंदा सुनिल मोहिते यांचा ११ विरुध्द ७ मतांनी पराभव केला. बागल मार्केट प्रभाग समिती सभापती होण्याची शोभा कवाळे यांना संधी मिळाली. त्यांना १२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कमलकार भोपळे यांना ७ मते मिळाली.ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतीपदी कोणाची निवड होणार याबाबत सगळ्यांची उत्सुकता होती. कारण या समितीवर भाजप - ताराराणी आघाडीचे १० व कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे १० असे समान बलाबल होते. कॉँग्रेसकडून माधुरी लाड तर ताराराणीकडून राजसिंह शेळके यांनी निवडणुक लढविली.
दोघांनाही समान मते मिळाल्यामुळे सभापतीपदाचा निर्णय चिठ्ठी टाकून करण्याचे ठरले. त्यानुसार डॉ. झाकीर हुसेन उर्दू मराठी शाळेची विद्यार्थीनी इरशाद पठाण हिने चिठ्ठी काढली. ही चिठ्ठी शेळके यांच्या नावाची होती. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.निवडणुक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पिठासन अधिकारी कुणाल खेमणार, महापौर स्वाती यवलुजे, उपमहापौर सुनिल पाटील, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.पाटील चौथ्यांदा तर शेळके तिसऱ्यांदा सभापतीकॉँग्रेसच्या प्रतिक्षा पाटील व ताराराणीचे राजसिंह शेळके हे नशीबवान ठरले आहे. पाटील यांची सलग चौथ्यांदा तर शेळके यांनी सलग तिसऱ्यांदा सभापती म्हणून निवड झाली. शेळके हे तिसºयावेळीही चिठ्ठी उचलूनच सभापती झाले आहेत. सभापती म्हणून निवड होतात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.