कोल्हापूर : ‘पाण्याचे बॉक्स आहे,’ असे सांगून कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या सावर्डे-पाटणकर (ता. राधानगरी) येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. ही कारवाई बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचून केली.या प्रकरणी संशयित अरुण संभाजी परीट (वय ३०) व प्रमोद सदाशिव कांबळे (२२, रा. सावर्डे पाटणकर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे २५ बॉक्स, कार असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.पोलिसांनी सांगितले की, बिद्री (ता. कागल) या ठिकाणी बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी एक कार तेथून जात होती. पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला अडविले. कारची तपासणी केली असता त्यात कारचालक व आणखी एक असे दोघे मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कारमध्ये पाण्याचे बॉक्स असल्याचे दोघांनी सांगितले.
कारची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅँडचे ७५० मि.लि.चे २५ कागदी बॉक्स मिळून आले. या प्रकरणी अरुण परीट व प्रमोद कांबळे या दोघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे कोल्हापूर जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.ही कारवाई कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पोवार, गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, के.बी. नडे, जवान संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, वैभव मोरे, आदींनी केली.
इचलकरंजीतही कारवाई; एकजण ताब्यातइचलकरंजी शहरात गोवा बनावटीचे विदेशी मद्य व कार असा सुमारे सहा लाख ६५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल सोमवारी (दि. २२) भरारी पथकाने कारसह जप्त केला. या प्रकरणी संशयित सुरेश जयपाल दड्डे याच्यावर कारवाई केली असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.