प्रदीप शिंदेकोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी विक्रमनगरातील श्री त्र्यंबोली विद्यालय हा आधारवड. याच शाळेतील मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप तेजाळविण्यासाठी सूर्यकांत माने सरांनी आयुष्याची तीस वर्षे वेचली. त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप देताना विद्यार्थी, पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सरांच्या माणुसकीची भुरळ लंडनपर्यंत पोहोचल्याने या ऋणानुबंधातून प्रत्यक्ष सेवानिवृत्तीच्या सत्काराला येऊन परदेशी पाहुण्यांनी आपले नाते अधिक दृढ केले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सूर्यकांत माने त्र्यंंबोली विद्यालयात १९९२ साली प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले. शाळेला स्वत:ची जागा नसल्याने त्र्यंबोली विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांच्या मदतीने विद्यालयास देवस्थान समितीची २२ गुंठे जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
सामान्य कुटुंबातील मुलांसाठी चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी लोकवर्गणीतून आठ वर्गखोल्याही बांधल्या. शिवाय गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शनामुळे अल्पावधीमध्येच शाळेची पटसंख्या १०० टक्के पूर्ण झाली.त्यांनी पुढाकार घेऊन शाळेतील शिक्षकांच्या पगारातील चौथा हिस्सा विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या गरजांवर खर्च, लांबून येणाऱ्या मुलांसाठी रिक्षाची सोय असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबविण्यास सुरुवात केली. सतत मुलांसाठी नवनवीन उपक्रम राबवीत असल्याने ते या परिसरात ‘एक उपक्रमशील शिक्षक’ म्हणून परिचित झाले.
डॉ. सचिन कुलकर्णी व स्वाती कुलकर्णी यांच्या माध्यमातून लंडन येथील डॉ. जेरॉल्ड कॉन्वे, जेन कॉन्वे, शिक्षिका ज्युली व शोना यांची त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनीही माने सरांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी हातभार लावत शाळेसाठी शालेय वस्तू मदत म्हणून दिल्याच; पण दरवर्षी या मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी ते शाळेत हजेरी लावण्यास सुरुवात केली.मुख्याध्यापक सूर्यकांत माने आॅक्टोबरमध्ये सेवानिवृत्त होणार असल्याचे समजताच त्यांच्या सेवानिवृत्ती सत्काराला या चौघांनी उपस्थित राहून त्यांच्याबद्दलची आत्मीयता प्रकट केली.
माने सरांचे हृदय शाळेतचसूर्यकांत माने सरांचा प्रवास हा निश्चितच खडतर असा होता; पण त्याचबरोबर त्यांनी शाळा चालविण्यासाठी दिलेली निकराची झुंज ही खरोखरीच समाधानकारक अशीच राहिली. त्यांचे हृदय त्यांच्या शरीरात नसून या शाळेत आहे, अशी भावना डॉ. जेरॉल्ड कॉन्वे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
येथील गोरगरीब मुलांसाठी माझ्या माध्यमातून मी भौतिक सुविधा आणि चांगले शिक्षण देऊ शकलो याचे मला मोठे समाधान आहे. जरी सेवानिवृत्त झालो तरी या शाळेसाठी माझे काम कायम चालूच राहणार आहे.- सूर्यकांत माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक