कोल्हापूर : डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व शिफारशीसह सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवकांच्यावतीने देशव्यापी ‘बेमुदत संप’ सातव्या दिवशी सुरुच होता. या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८०० डाकसेवक सहभागी झाले आहेत.संपात देशातील एनयुजीडीएस, एआयजीडीएसयु, बीडीके यासह अन्य संघटना सहभागी झाल्या आहेत. सुमारे २ लाख ८० हजार ग्रामीण डाकसेवक देशभर संपात सहभागी झाले आहेत. ग्रामीण डाक सेवक हा ग्रामीण भागापर्यंत दळणवळणाचे संदेश देणारा एकमेव दुवा असून, तोच डाकसेवक दुर्लक्षित राहिला आहे.
यापूर्वीही डाकसेवकांच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेमुदत आंदोलने केली होती. परंतु, आमच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.जिल्ह्यातील सुमारे ८०० कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने सरकारी दस्तावेज, वृद्धापवेतन, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन, नोटिसा, पत्रव्यवहार सर्व यंत्रणा कोलमडली आहे.
ग्रामीण भागातील ८०० कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून सुमारे १ कोटी व्यवहार ठप्प झाले आहेत. केंद्र सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर संप सुरूच राहील.- बी. डी. कलगोंडा, अध्यक्ष, एआयजीडीएसयू