कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.सलग ४२ दिवस झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासह २२ मागण्यांचे लेखी आश्वासन सरकारने दिले होते. मात्र सरकारने अद्याप एकाही मागणीची पूर्तता केलेली नाही.
सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करीत असल्याने दबाव निर्माण करण्याकरिता कोल्हापुरातून २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर राज्यव्यापी गाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्याकरिता शाहू छत्रपती, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार, सर्वपक्षीय आमदारांनी सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा असून त्यांना व्यक्तिश: भेटून तसे आवाहन करणार आहोत, असे मुळीक यांनी सांगितले.मंगळवारी (दि. १३) इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शाहू छत्रपती यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना मोर्चाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शहराबाहेर एका कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने संपर्क झाला नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात पहिल्यापासून शाहू छत्रपती स्वत:हून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे मोर्चात असणे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत, असेही मुळीक यांनी स्ष्ट केले.
विचारविनिमय व्हायला हवादरम्यान, २६ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही किंवा कोणी प्रत्यक्ष भेटूनही माहितीही दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शाहू छत्रपती यांनी दिले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे गुरुवारी सादर झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूरकरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
तोपर्यंत हा अहवाल कसा असेल, त्यातील शिफारशी काय आहेत, यावर विचारविनिमय व्हायला हवा, अभ्यास व्हायला पाहिजे. आम्ही पहिल्यापासून आंदोलनात आहोत, यापुढेही अग्रभागी असू. मात्र पुढचे निर्णय घेत असताना सामुदायिक विचारविनिमय, चर्चा व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.