कोल्हापूर : येथील शहरात बाहेरून येणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांना दिवसभरात प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत तब्बल दोन हजार वाहने शहरात येण्यापासून रोखली गेली. नेहमी शहराच्या मध्यवस्तीतील शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी दूर झाल्याने या दोन्ही व्यापारपेठांनी अखेर मोकळा श्वास घेतला.शहर वाहतूक शाखेने शहरात प्रवेश करणाऱ्या ११ पॉर्इंटवर ८० पोलीस कर्मचारी दिवसभर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. या मोहिमेचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसला असून, माल शहराबाहेर ट्रकमध्ये अडकल्याने आलेले ग्राहक सोडावे लागत आहेत.शहराअंतर्गत अवजड वाहतूक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी २४ डिसेंबरपासून सुरू झाली.
शहर वाहतूक शाखेकडून ७ जानेवारीपर्यंत वाहनधारकांचे प्रबोधन व पर्यायी मार्गाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अवजड वाहनांच्या बंदीमुळे नेहमी गजबलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी अशा व्यापारी पेठांमध्ये नेहमीच्या तुलनेत कमी वाहनाची वर्दळ दिसत आहे.
शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीबाबत एका अभ्यास समितीने आठ दिवस सर्व्हे करून तयार केलेल्या अहवालामुळे शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व्यापारी पेठांमध्ये रोज येणारी अवजड वाहतूक हे कोंडीचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील धान्य तसेच अन्य व्यापाऱ्यांकडे मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह अवजड वाहनांवर दिवसा शहरात बंदी करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.
गेली तीन दिवस सहा अधिकारी व ७५ कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनधारकांना शहरात येण्यापासून रोखण्यात आले. अशा वाहनांना वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी अथवा मार्केट यार्डमध्ये थांबवून ठेवले आहे.
हरकतीनंतर कायमची अंमलबजावणीशहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ‘अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी’चे माहिती फलक लावण्यात आले आहेत. एस.टी., के.एम.टी. व अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांत लोकांच्या हरकती शहर वाहतूक शाखेत स्वीकारल्या जाणार आहेत. एकत्र बैठक घेऊन ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.अनिल गुजर ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा