कोल्हापूर : शहरात काही दिवसांपूर्वी वरून कान फुंकणारे आले होते; परंतु इथं मशाल तेवढी मोठी आहे. समोर कार्यकर्ते कुठे होते? अशी विचारणा करत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उद्धवसेनेला चिमटा काढला.कोणत्याही सरकारने घेतले नाहीत असे निर्णय महायुतीने साडेसात वर्षांत घेतले आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवा, कामगार, शेतकरी अशा सर्वांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सर्व स्तरांतील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. महायुतीच्या रिपोर्ट कार्डबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उत्तम कोराणे, किशोर घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, जेव्हा काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा माझे दुकान बंद करीन, अशी जाहीर घोषणा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणाऱ्यांचे दुकानच आता बंद होत आहे.महायुतीच्या सरकारने विक्रमी असे निर्णय घेतले आहेत. लोकसभेला निगेटिव्ह नरेटिव्ह काँग्रेसने निर्माण केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या राज्यात कुठेही खटाखट पैसे आले नाहीत. संविधान बदलले नाही. मुस्लिमांना कोणीही देशाबाहेर काढले नाही. त्यामुळे आता त्यांनी मतदारांची नावे बाहेर काढल्याचे दुसरे नरेटिव्ह तयार केले आहे; परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाही.भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, कोल्हापूर उत्तरला ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहणार आहोत. आता फक्त राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी राबणार आहोत. तेच आम्हा सर्वांचे उद्दिष्ट आहे.
Kolhapur: इथं मशाल तेवढी मोठी, समोर कार्यकर्ते कुठे होते?; राजेश क्षीरसागरांचा उद्धवसेनेला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 1:23 PM