विश्वास पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली.
या नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपला धूळ चारून नगराध्यक्षासह दहा जागा जिंकून सत्ता काबीज केली. या विजयामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली तर त्यांचा पराभव होऊ शकतो याचेही प्रत्यंतर या निकालाने दिले आहे.गेल्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि खासदार शेट्टी यांनी पुुढाकार घेऊन महाआघाडी स्थापन केली व दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील सर्व पक्षांची एकत्रित मोट बांधून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राज्यात व केंद्रात सत्तांतर झाले, आता शेतकऱ्यांनाही अच्छे दिन येतील असे वाटत असतानाच मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून खासदार शेट्टी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्धच रणशिंग फुंकले.
आता शेट्टी हे केंद्र व राज्यातूनही भाजपचे सरकार उलथवून टाका यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्चित झाले आहे. संघटनेची आघाडी ही काँग्रेसशी होणार आहे. त्या आघाडीची लिटमस चाचणी घेणारी निवडणूक म्हणून शिरोळच्या निवडणुकीकडे पाहिले गेले.शिरोळची नगरपरिषद म्हणून ही पहिलीच निवडणूक होती. तिथे मावळत्या सभागृहात ‘गोकुळ’चे संचालक व भाजपचे नेते अनिल यादव यांची सत्ता होती. तिथे शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र यड्रावकर हे एकत्र आले. त्यांना पडद्यामागून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी ताकद दिली. त्यामुळे सत्तेचा गुलाल मिळाला. भाजपने स्वबळावर लढूनही चांगले यश मिळविले आहे. यापूर्वी काँग्रेस विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र असे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र दिसले.
शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बहुजन विकास आघाडी केली; परंतु त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. शिवसेनेचा भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न होता; परंतु भाजपने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांची युती झाली असती तर त्यांचीच सत्ता आली असती, हे वेगळे सांगायची गरज नाही.
नगरपरिषदेचे एकूण मतदान २१ हजार ७३१ आहे. एका नगरपरिषदेच्या निकालाचा फारसा परिणाम शिरोळ विधानसभा निवडणुकीवरही होणार नाही; परंतु कोण कुणासोबत जाणार व कुणाची काय अडचण होणार याचे आडाखे बांधण्यासाठी म्हणून मात्र या निकालाचा नक्कीच उपयोग होणार आहे.
नगरपरिषदेत एकत्र आलेल्या स्वाभिमानी व दोन्ही काँग्रेसची विधानसभेलाही मोठीच पंचाईत होणार आहे. कारण या तिन्ही पक्षांकडे विधानसभेचे उमेदवार लांगा घालून तयार आहेत. स्वाभिमानी काँग्रेससोबत राज्य आघाडीत सहभागी झाल्यास संघटनेचा या जागेवर दावा असेल. त्यावेळी या तिन्ही पक्षांचीही मोठीच कोंडी होणार आहे.