कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या मुख्य कामाला प्रारंभ होईल.पर्यायी शिवाजी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन उर्वरित काम ‘पुरातत्त्व’ विभागाच्या कायदेशीर अडचणींमुळे २०१५ पासून अडकले होते. याबाबत सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या पुढाकाराने सोमवार (दि. २१)पासून काम सुरू करण्यात आले.
पुलाच्या कामाची परवानगी मिळण्याबाबत अधीक्षक मोहिते हे पुरातत्त्व विभागाच्या संपर्कात असून, पुलाच्या कामाबाबत कायदेशीर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कृती समितीशी चर्चा केल्यानंतर सोमवारपासून पुलाचे शहराच्या बाजूने काम सुरू करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात पुलाच्या चौकातील पर्यायी पुलाला अडथळा ठरणारा शाहूकालीन पाण्याचा हौद जेसीबी यंत्राद्वारे उतरविण्यात आला. त्यानंतर तेथे सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांनी कामाची पाहणी केली. त्यानंतर मुख्य कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याने बुधवारी ‘लाईनआउट’चे काम करून घेण्यात येणार असल्याचे ठेकेदारांना सांगून सूचना दिल्या. त्यानंतर कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, आदींनी येऊन पुलाच्या कामाची पाहणी केली.दरम्यान, येत्या दोन दिवसांत पर्यायी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या पुलाच्या मुख्य कामाला प्रारंभ होणार आहे. ‘पुरातत्त्व’च्या नियमांना बाधा न आणता कॉलमऐवजी भिंत बांधून त्यावर आधारित पूल उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ठेकेदार एन. डी. लाड हे ‘आसमास’ कंपनीकडून मार्गदर्शन घेत आहेत.