कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून वातावरण शिवमय करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’,‘जय भवानी...जय शिवाजी’अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.सकाळी ११ वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा येथून या मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. ही रॅली आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौकमार्गे येऊन उभा मारुती चौकात समारोप झाला. ‘जय भवानी....जय शिवाजी....छत्रपती शिवाजी महाराज की जय...’अशा घोषणांनी शहर दुमदुमले.
या रॅलीत माजी उपमहापौर रवी इंगवले, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सचिव महेश जाधव, संचालक लालासाहेब गायकवाड, चंद्रकांत जगदाळे, उत्सव कमिटी अध्यक्ष विशाल बोंगाळे, उपाध्यक्ष अशोक देसाई यांच्यासह सुरेश जरग, श्रीकांत भोसले, अभिजित राऊत, योगेश इंगवले, शाहीर दिलीप सावंत, अक्षय मोरे यांच्यासह शिवाजी पेठेतील तरुण मंडळांचे कार्यकर्ते व शिवभक्त सहभागी झाले होते.
शाहिरी पोवाड्यातून ‘गर्जना महाराष्ट्राची’शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात सायंकाळी साडेसहा वाजता शिवशाहीर दिलीप सावंत यांचा ‘गर्जना महाराष्ट्राची’ हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम झाला. पोवाड्यातून आसमंतात गर्जना करत महाराष्ट्राचा पट उलगडला.
लक्षवेधी ‘रायगडचा महाद्वार’उभा मारुती चौकात रायगडवरील नगारखाना बाजूकडील महाद्वारची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यावर विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे हे महाद्वार लक्षवेधी ठरत आहे. ते पाहण्यासाठी शहरवासीयांची गर्दी होत आहे.