कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कामासाठी स्मशानभूमी येथून नदीपात्राच्या काठावरून रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर या ठिकाणी कॉलमच्या कामासाठी तयार केलेल्या ‘राफ्ट’वर येत्या शनिवारी (दि. ३) काँक्रिट टाकण्यात येणार आहे.पर्यायी शिवाजी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुलाच्या कामासाठी सळई अंथरूण तयार केलेल्या राफ्टवर काँक्रिट टाकण्यात येणार आहे, पण त्यासाठी तेथे यंत्रसामग्री पोहोचवणे आवश्यक आहे. या ठिकाणी माती नदीपात्रात घसरत असल्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून स्मशानभूमीनजीक नदीपात्राच्या कडेने सुमारे १५ फूट रुंद कच्चा रस्ता जेसीबीद्वारे करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे.
हा रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पर्यायी पुलाच्या पश्चिमेस दोन कमानीत नदीपात्रात जुन्या ठेकेदाराने टाकलेला मुरूम पोकलॅनद्वारे काढून तेथून नदीचे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी हा नदीपात्रातील काढलेला मुरूम ट्रॅक्टर-ट्रॉलीतून जुन्या पुलावरून वाहतूक करून स्मशानभूमीपासून तयार केलेल्या कच्च्या रस्त्याने अखेरच्या कमानीतील नदीपात्रात पुन्हा टाकण्यात येणार आहे.
याद्वारे तिसऱ्या व अखेरच्या नियोजित कमानीतून जाणारे नदीचे पाणी अडवून पूर्ण झालेल्या दोन कमानीतून वळविण्यात येत आहे. दरम्यान, सळई अंथरूण तयार केलेल्या राफ्टवर येत्या शनिवारी काँक्रिट टाकण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य कामाला गती येणार आहे.