कोल्हापूर - आर. के. नगरातील मातोश्री वृध्दाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पांडुरंग पाटोळे (वय ७५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.
गेले काही दिवस ते आजारी होते. उपचार घेऊन ते घरी आले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पाटोळे गुजराती हायस्कूलमधून शिपाई पदावरुन २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे कुटुंबीय मंगळवार पेठेतील खुपेरकर गल्ली येथे राहत होते. त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आई रुक्मिणी पांडुरंग पाटोळे यांच्या आर. के. नगर परिसरातील अडीच एकर जमिनीत १९९५ ला स्वत:चे निवृत्ती वेतन, आईला मिळालेल्या निधीतून मातोश्री वृद्धाश्रम उभा केला. त्या ठिकाणी सर्व कुटुुंबीयच सेवेसाठी रुजू झाले. सध्या या वृद्धाश्रमात राज्यभरातील ७० ज्येष्ठ नागरिक राहतात. गेली तीस वर्षे वृध्दाश्रमाचे काम सुरु असून त्यांची तिसरी पिढी सेवेत आहे.पाटोळे यांना कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. शिव-बसव पुरस्कार, पुणे येथील संस्थेचा गंगा गोयल पुरस्कार, रवी बँक, हुपरी रेंदाळ सहकारी बँकेचा पुरस्कारासह आदी संस्थानी गौरविले होते.