कोल्हापूर : गेली १५ दिवस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. या दरवाढीविरोधात कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेतर्फे ‘चक्का चाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. इंधन दरवाढ कमी करा, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता सरकार उलथवेल, असा इशारा यावेळी दिला.कावळा नाका येथील ताराराणी चौकात सर्वप्रकारच्या वाहनांना सुमारे १५ मिनिटे रस्त्यावर थांबवून रस्ता रोको करण्यात आले. त्यामुळे स्टेशन रोड मलबार हॉटेलपर्यंत तर कावळा नाका चौकातून मार्केट यार्ड कमानीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.गेले १५ दिवस पेट्रोल व डिझेल दरवाढ होत आहे. त्याचा फटका वाहनधारकांसह सर्वसामान्यांवर झाला आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे.
यासाठी या वाढलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्ह शिवसेनेतर्फे कावळा नाका येथे चारचाकी वाहनधारकांना १५ मिनिटे वाहने ज्या-त्या ठिकाणी थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. या रास्ता रोकोमध्ये स्वत:हून चालक आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे वाहनांच्या रांगा या चारही बाजूला लागल्या होत्या.
यावेळी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या मार्गावर पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता.आंदोलनात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, जिल्हा महिला संघटक शुभांगी पोवार, सुजित चव्हाण, दत्ता टिपुगडे, राजेंद्र पाटील, नगरसेवक अभिजित चव्हाण, रवी चौगले, दिलीप देसाई, दिलीप जाधव, हर्षल सुर्वे, विराज पाटील, मंजित माने, जयश्री खोत, दिनेश परमार, राजू सांगावकर, कमल पाटील, शांताराम पाटील, दीपक पाटील, राजीव नाईकवडे, अजित चौगुले, चंद्रकांत भोसले, सुधीर राणे, अवधूत साळोखे, अभिजित बुकशेठ आदींचा सहभाग होता.
पाच टक्के उद्योगपतींचे केंद्र सरकार हित सांभाळत आहे. ९५ टक्के इंधन दरवाढीने हैराण झाली आहे. दरवाढीला सरकारचे धोरण जबाबदार आहे.- संजय पवार,जिल्हाप्रमुख शिवसेना,कोल्हापूर.