कोल्हापूर : सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतील नगरसेवकांची अंतर्गत नाराजी, आधी आर्थिक आमिष दाखविण्याचा झालेला प्रयत्न आणि आता आम्ही घोडेबाजार करणार नाही, अशी नेत्यांनी घेतलेली भूमिका, ऐनवेळी चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेने निवडणूक लढण्याचा ऐनवेळी घेतलेला निर्णय यामुळे नाट्यमय वळणावर पोहोचलेल्या महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले.
उमेदवार निश्चित करेपर्यंत इच्छुकांमधील नाराजी दूर करण्याचा सत्तारुढ आघाडीने प्रयत्न केला असला, तरी ताराराणी आघाडीने ऐनवेळी महापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यामुळे भाजपमधील काही नगरसेवक नाराज झाल्याचे स्पष्ट झाले.सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत महापौरपदासाठी शोभा पंडीतराव बोंद्रे (कॉँग्रेस), रुपाराणी संग्रामसिंह निकम (ताराराणी आघाडी), प्रतिज्ञा अरुण निल्ले (शिवसेना) यांनी तर उपमहापौरपदासाठी महेश आबासो सावंत (राष्ट्रवादी), कमलाकर यशवंत भोपळे (भाजप), अभिजित विश्वास चव्हाण (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज भरले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होत आहे.यापूर्वी शिवसेना नगरसेवक सत्तारुढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीसोबत राहिले, परंतु यावेळी प्रथमच महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सभागृहात शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.
दुपारी तीन वाजता शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले, गटनेते नियाज खान, अभिजित चव्हाण नगरसचिव कार्यालयात पोहोचले. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले आणि तातडीने भरून दाखलही केले. यावेळी त्यांचे राहुल चव्हाण हे मात्र अनुपस्थित होते.पाठोपाठ भाजप ताराराणी आघाडीचे बहुसंख्य नगरसेवक घोषणाबाजी करत नगरसचिव कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी रुपाराणी निकम व कमलाकर भापळे यांचे अर्ज दाखल केले. यावेळी गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई विरोधी पक्षनेते विलास वास्कर उपस्थित होते.दुपारी साडेचार वाजता कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील आदी शोभा बोंद्रे, महेश सावंत या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांसह महापालिकेत पोहोचले. त्याच्यासोबत अगदी मोजके नगरसेवक होते. बोंद्रे व सावंत यांच्या समर्थकांची मात्र गर्दी झाली होती.
कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक सहलीवरभाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी महापौरपदाच्या निडणुकीत नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे सावध झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना रविवारपासून त्यांच्या ३५ नगरसेवकांना गोवा येथे सहलीसाठी नेले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ मोजके नगरसेवक होते.
उर्वरित नऊ नगरसेवकसुद्धा सोमवारी रात्री सहलीवर रवाना झाले. सर्व नगरसेवकांना मोबाईल वापरावर तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. त्यांचा बाहेर कोणाशीही संपर्क होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे.
ऐनवेळी उपमहापौरसाठी महेश सावंत यांचे नावराष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी केवळ सचिन पाटील यांचेच नाव शनिवारपर्यंत पुढे होते. एवढेच नाही तर त्यांच्याशिवाय अन्य कोणी इच्छुक नसल्याचेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत होते. परंतु ऐनवेळी सचिन पाटील यांना डावलून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला दोन कारणे आहेत.
सावंत राष्ट्रवादीतून फुटतील अशी चर्चा होती. त्यांनी बंडखोरी करू नये. शिवाय त्यांच्यामुळे अजिंक्य चव्हाण हे राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करतील, अशी नेत्यांना आशा आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ घालण्यात आली.
शिवसेनेचा निर्णय कोणाच्या पथ्यावर ?शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहण्याच्या निर्णय घेतला होता. त्याच्या बदल्यात त्यांच्या नियाज खान व राहुल चव्हाण यांना परिवहन सभापतिपद देण्यात आले. पुढील वर्षी हे पद अभिजित चव्हाण यांना देण्यात येणार होते. परंतु सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांनाच चकित केले.
शिवनेनेचे चारही नगरसेवक भाजप-ताराराणीच्या संपर्कात असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू असतानाच असा एकदम ‘यू टर्न’ कसा काय घेतला, यावरदेखील चर्चा सुरू झाली. ते फुटलेत तर त्यांची चार मते भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मिळतील अशी शक्यता होती. पण आता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडतो, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
भाजप-ताराराणी सहा नगरसेवकांच्या शोधातसध्या सभागृहात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ४४ नगरसेवक आहेत, तर भाजप ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक आहेत. जर खरोखरच शिवसेनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांची चार मते ही त्यांच्याच उमेदवारांना मिळतील. त्यामुळे बहुमतासाठी ‘मॅजिक फिगर’ ही ३९ इतकी असणार आहे.
भाजप-ताराराणी आघाडीला हा आकडा गाठण्यासाठी आणखी ६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. परंतु कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दगाबाजी होऊ नये म्हणून खबरदारी घेतल्याने आता भाजप-ताराराणीचा डाव यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे.