कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला हॉकीची संस्थानकालीन परंपरा आहे. या परंपरेतून कोल्हापूरने त्या काळापासून राज्यासह देशाला अनेक नामांकित हॉकीपटू दिले आहेत. त्या काळी सुविधा नव्हत्या तरी हे खेळाडू घडले आहेत. आता भारतीय खेल प्राधिकरणाचे नूल (ता. गडहिंग्लज) येथे हॉकी केंद्र झाले आहे. या माध्यमातून देशाला नव्या दमाचे खेळाडू कोल्हापूरमधून मिळावेत, यासाठी विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही ‘साई’चे नूतन हॉकी प्रशिक्षक अनिकेत मोरे यांनी दिली. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मोरे यांनी ‘लोकमत’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली कारकिर्द उलगडली.
संस्थानकालापासून लाईन बझारमध्ये हॉकीची परंपरा आहे. त्यात माझे आजोळही येथेच असल्यामुळे मला येथून लहानपणापासून हॉकीचे बाळकडू मिळाले. लाईन बझार हॉकी मैदानावर पद्मा पथक, छावा, कोल्हापूर पोलीस आणि पोलीस बॉईज संघ यांसह अन्य नामवंत संघांचे सामने मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यामुळे माझ्या मनात लहानपणापासूनच हॉकीची क्रेझ निर्माण झाली. शालेय शिक्षण न्यू हायस्कूल व संजीवन पब्लिक स्कूलमधून झाले. दोन्ही ठिकाणी हॉकी खेळास प्राधान्य मिळाले; त्यामुळे हॉकीमध्ये मी पारंगत झालो. या दरम्यान कोल्हापुरातील दिग्गज हॉकी प्रशिक्षक, संघटकांचे मला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मला प्रतिनिधित्व करता आले. हम मित्रमंडळ, शाम स्पोर्टस, छावा मित्रमंडळ, देवगिरी फायटर्स, आदी संघांतून मी प्रतिनिधित्व केले. खेळातील कौशल्य पाहून डी. सी. नरके विद्यानिकेतन, भोगावती पब्लिक स्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिल्ट्री स्कूल, पुलगाव (पुणे), त्यानंतर कसबा बावडा दत्ताबाळ हायस्कूल येथे प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली. या दरम्यान २०१७-१८ साली बंगलोर येथे एनआयसीमार्फत एक वर्षे कालावधीची हॉकीमधील पदविका प्राप्त केली. त्यातून हॉकीमधील नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याचे मोरे म्हणाले.
चौकट : नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा
सध्या हाॅकीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आले असून, मुलांनी ते आत्मसात केले पाहिजे. कोणत्याही खेळात सराव महत्त्वाचा असून, स्टॅमिना गरजेचा आहे. खेळाडूंनी नेहमीच अपडेट राहून होणारे बदल स्वीकारले पाहिजेत, असा सल्ला मोरे यांनी दिला. सध्या आपल्याकडे मातीचे मैदान आहेत. मात्र आजच्या काळात टर्फ मैदानावर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने होत आहेत; यामुळेच सध्या टर्फची मैदान होणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीतील नियमावलीही बदलत आहे. तिचाही अभ्यास करून त्याप्रमाणे खेळाडूंच्या शैलीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असून नवे तंत्रज्ञान कोल्हापूरच्या प्रत्येक हॉकी खेळाडूंपर्यंत पोहोचवून त्यांचा खेळातील टक्का वाढवायचा आहे. त्यातून एक तरी खेळाडू भारतीय संघात खेळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.