कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात डॉक्टर असून विविध शासकीय कार्यालयात नोकरीचे कॉल काढणे व नेमणुका करण्याचे काम करीत असलेचे भासवून भामट्याने आजरा येथील अकरा युवकांना २२ हजार रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी संशयित भामटा रामदास शामु महाजन (वय ४४, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, फिर्यादी आनंद गुंडू कुंभार (वय ५०, रा. आजरा, सध्या रा. धनकवडी, पुणे) हे शासकीय नोकरी करतात. दि. १६ जून रोजी ते कात्रज-पुणे ते कोल्हापूर एस. टी. बसने कोल्हापूरला येत असताना त्यांची भामटा रामदास महाजन याचेशी ओळख झाली.
प्रवासात झालेल्या तोंडओळखीतून भामटा महाजन याने आपण सीपीआर रुग्णालयात डॉक्टर आहे. गरजु उमेदवारांचे नोकरीचे कॉल काढणे व नेमणुका करण्याचे काम करीत असलेचे सांगुन कुंभार यांचा विश्वास संपादन केला.
मध्यवर्ती बसस्थानकावर पोहचलेनंतर कुंभार यांचेकडून तुमच्या मुलाचे नोकरीचे काम करतो असे सांगुन बाराशे रुपये घेतले. त्यानंतर वारंवार फोनवरुन संपर्क साधून २५ जूनला कुंभार यांची भेट घेतली. महाजन याचेवर विश्वास बसल्याने कुंभार यांनी आपले मुलासह आजरा येथील अकरा युवकांना नोकरी लावण्यासाठी महाजन याला प्रत्येकी बावीसे रुपयाप्रमाणे एकुण २२ हजार रुपये दिले.
महाजन याने या सर्वांना एसटी बसवर चालक व वाहक म्हणून बनावट नियुक्तीपत्रे दिले. आपल्या मुलासह अन्य मुलांची फसवणूक झालेचे समजताच कुंभार यांनी गुरुवारी (दि. १३) शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीसांनी सीपीआर रुग्णालयात चौकशी केली असता रामदास महाजन नावाचा डॉक्टर कोणी नसलेचे सांगण्यात आले. संशयित भामट्याचा पोलीस शोध घेत आहे. तो मिळालेनंतर आणखी किंती जणांना गंडा घातल्याचे निष्पन्न होणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.