कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील स्वर्गीय मालती शामराव पाटील चषक क्रिकेट स्पर्धेत कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस अकॅडमीने रमेश कदम क्रिकेट अकॅडमीचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.राजाराम कॉलेज मैदानावर झालेल्या दोनदिवसीय अंतिम सामन्यात पहिल्या डावात रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने २८.३ षटकांत सर्वबाद १७० धावा केल्या. यामध्ये अविनाश बरगे ६९, निखिल नाईक नाबाद ५२, आदर्श मैल याने १० धावा केल्या.
कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस अकॅडमीकडून पहिल्या डावात शुभम मानेने ४, श्रीराज चव्हाणने ३ व ओमकार मोहितेने २ बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना ‘मोगणे सहारा’ने पहिल्या डावात ५२ षटकांत सर्वबाद २५९ धावा केल्या. यामध्ये यश पाटील १२५, इक्बाल सुनकंद ५७, शुभम पुजारी २४ व ओमकार मोहितेने ११ धावा केल्या.
कदम अकॅडमीकडून श्रीराज चव्हाण, श्रवण निकम, अमान आरचीकर व अविनाश बरगे यांनी प्रत्येकी २ बळी, तर रणजित निकमने १ बळी घेतला. यात मोगणे सहारा संघाने पहिल्या डावात ८९ धावांची आघाडी घेतली. दुसºया डावात कदम अकॅडमीने २४ षटकांत सर्वबाद १२२ धावा केल्या. यात वैभव पाटील ३२, क्षितीज पाटील २६, करण वाघमोडे २१, रणजित निकमने १४ धावा केल्या.
दुसऱ्या डावात मोगणे सहारा संघाकडून श्रीराज चव्हाणने ७, तर ओमकार मोहितेने ३ बळी घेतले. मोगणे सहारा संघाला विजयासाठी ३३ धावांची आवश्यकता होती. त्यात ३.३ षटकांत १ बाद ३४ धावा करीत विजयासह अजिंक्यपदही पटकाविले. यात इक्बाल सुनकंद नाबाद २३, राज पाटील ९ धावा केल्या. दुसºया डावात कदम अकॅडमीकडून रणजित निकमने १ बळी घेतला.