- समीर देशपांडेकोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. मोदी यांनी देशातील सामाजिक सदभाव उध्वस्त केला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, या नऊ वर्षात अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. महागाई, बेरोजगारी वाढली. भरमसाठी कर आकारणी करूनही देशावरील कर्ज वाढतच निघाले आहे. हे देखील पैसे पुरेनात म्हणून सरकारी कंपन्याही विकायला काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही आणि आत्महत्याही थांबल्या नाहीत. अदानीसारख्या कंत्राटदारांना पाठबळ दिले गेले. चीनने आक्रमण केल्यानंतरही त्यांना क्लीनचीट दिली गेली. पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत हे दुर्देवी आहे.
अल्पसंख्यांक, एस. टी. एन.टी.यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. जातनिहाय जनगणनेविषयी मोदी बोलत नाहीत. सर्व तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लावण्यात येत आहेत. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक कल्याणाच्या योजनांमध्ये कपात केली जात आहे. काेरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाईही मिळालेली नाही.
शिंदे, फडणवीस सामना करू शकत नाहीतज्या पध्दतीने राज्यात सत्तांतर झाले ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस हे महाविकास आघाडीशी सामना करू शकत नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस कर्नाटकचे जे विश्लेषण करत आहेत तसे नाही. बेंगलोर विभाग वगळता अन्य कुठल्याही भागात भाजपला जादा मतदान झालेले नाही.