सचिन भोसले ।कोल्हापूर : संस्थान काळापासून कोल्हापूरचा कुस्तीमध्ये देशभरात दबदबा आहे. अनेक मल्लही या मातीने तयार केले आहेत. कुस्तीबरोबर कबड्डी, खो-खो, टेबलटेनिस, जलतरण, शुटींग, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आदी खेळ प्रकारातही कोल्हापूरच्या खेळाडूंनी देश-परदेशात नाव कमावले आहे. मात्र, या खेळाडूंना सरावाठी एकाच छताखाली सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक असे एकही मैदान कोल्हापुरात नाही.
आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार खेळ आणि त्या पद्धतीच्या सुविधा केवळ पुणे, मुंबई, कोलकाता, बंगलोर, आदी मोठ्या शहरांतच उपलब्ध आहेत. अशी सुविधा निर्माण करण्यासाठी २००९ साली तत्कालीन राज्य शासनाने कोल्हापुरातील पद्माळा या कैद्यांच्या शेतीत १९ एकरांचे आरक्षण टाकून पाच जिल्ह्यासाठी विभागीय क्रीडासंकुल उभारण्याचे शिवधनुष्य उचलेले. मात्र, नोव्हेंबर २०१८ पर्यंत हे संकुल काही पूर्ण होण्याचे नाव घेईना.
सन २०१० च्या सुमारास राज्य शासनाने कोल्हापूर या मध्यवर्ती ठिकाणी कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या पाच जिल्ह्यांकरीता विभागीय क्रीडासंकुल मंजूर केले. त्यात पहिल्या टप्प्यात एकूण २४ कोटींपैकी १७ कोटी रुपयांची कामे झाल्याचा गाजावाजा क्रीडा खाते करत आहे. प्रत्यक्षात जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव पाणी मुरते म्हणून अपूर्ण अवस्थेत आहेत. शूटिंग रेंज पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ती अद्यापही खुली केलेली नाही.
व्हॉलिबॉल मैदान, सिंथेटिक अॅथलेटिक्स मैदान आंतरराष्ट्रीय मानांकनाला धरून नाही. याशिवाय फुटबॉल मैदानही या ट्रॅकच्या मध्येच अव्यवस्थित केले आहे. कबड्डी, खो-खो मैदान म्हणजे दगड आणि धोंडे असेच ठिकाण आहे. दर्जाहीन कामामुळे पुन्हा दुरुस्ती करावी लागेल अशी स्थिती आहे. विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहेही उपलब्ध नाहीत. या संकुलातून दर्जेदारखेळाडू देशासाठी निर्माण करावयाचे झाल्यास कसे तयार करणार, असा सवाल क्रीडा मार्गदर्शकांतून विचारला जात आहे.
राज्य शासनाने २६ मार्च २००३ साली एका शासन निर्णयानुसार राज्यातील नऊ विभागांत विभागीय क्रीडासंकुले स्थापन्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापुरातील विभागीय क्रीडासंकुलासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नोव्हेंबर २०१८ अखेर या मैदानाचे ७८ टक्के इतकेच काम पूर्ण झाल्याचा दावा क्रीडा उपसंचालक कार्यालयाने माहिती अधिकारात मागविलेल्या कागदपत्रात नमूद केला आहे. प्रत्यक्षात जागेवर पाहणी केल्यास किती टक्के काम पूर्ण झाले आहे आणि दर्जा काय आहे, हेही नागरिकांना कळेल.जलतरण तलावाबाबत दोषी कोण ?संकुलातील जलतरण व डायव्हिंग तलावासाठी जागेबाबत क्रीडासंकुल समितीने सांगितल्याप्रमाणे वास्तुविशारदाने त्याच ठिकाणचा अभ्यास न करता आराखडा तयार केला आणि त्यानुसार बांधकामही पूर्ण झाले. संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर त्यातून जमिनीतून उमाळे व अशुद्ध पाणी मिसळू लागले. ती लागलेली गळती काढण्याचा गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा प्रयत्न झाला; पण ते काही दुरुस्त होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत आयआयटीच्या तज्ज्ञांनाही पाचारण केले आहे. त्यांचा अहवाल अद्यापही क्रीडासंकुल समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना पोहोचलेला नाही. विशेष म्हणजे जलतरण तलावासाठी ७१ लाख ६९ हजार ५९६, तर डायव्हिंग तलावासाठी एक कोटी पाच लाख २३ हजार ३१५ रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हा तलावच बिनकामाचा राहिला तर झालेल्या खर्चाची जबाबदारी कोणावर निश्चित करायची? चूक कोणाची यापेक्षा सरकार यावर काय निर्णय घेणार याबाबत कोल्हापूरवासीयांकडून विचारणा केली जात आहे.गरज इनडोअर कबड्डी मैदानाची : जिल्ह्यात एकवीरा, शाहू क्रीडा, शिवशाहू, मावळा (सडोली), जयकिसान वडणगे, छावा, ताराराणी, महालक्ष्मी, सह्याद्री, इचलकरंजीतील जयहिंद क्रीडा, राष्ट्रसेवा (तळसंदे), गुडाळेश्वर (गुडाळ), तर महिलांंमध्ये महालक्ष्मी क्र ीडा, डायनॅमिक्स (इचलकरंजी), जयकिसान वडणगे असे कबड्डीचे ६८ संघ नोंदणीकृत आहेत. या संघांना इनडोअर स्टेडियमची गरज आहे.संकुलाच्या दुर्दशेला प्रारंभविभागीय क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार जलतरण तलाव व डायव्हिंग तलाव २०१२ मध्ये बांधण्यात आला. मात्र, बांधल्यानंतर त्यात खालून अशुद्ध पाण्याचे उमाळे सुरू झाले. त्यानंतर ते मिसळणारे पाणी बंद व्हावे, याकरिता नानाविध प्रकारचे प्रयोगही करण्यात आले. खल, चर्चा, आंदोलने, तज्ज्ञांची मते असे सर्व प्रकारचे उपाय केल्यानंतरही हा तलाव काही केल्या पूर्ण झालाच नाही. यात पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रत्येक आढावा बैठकीत या कामाचा आढावा घेत आणि प्रत्येक वेळी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधितांना खडे बोल सुनावत गेले. आराखडा बनविणाºया कंपनीच्या वास्तुविशारदांना नोटीस, कायदेशीर प्रक्रिया, आदी करीत अखेर जुलै २०१८ मध्ये आयआयटीच्या तज्ज्ञांकडून या जलतरण तलावाची तांत्रिक तपासणी करून घेण्याचा निर्णय झाला. होय, नाही करीत अखेर नोव्हेंबर २०१८ च्या पहिल्या आठवड्यात ही तज्ज्ञ समितीही तपासणी करून गेली. मात्र, अद्यापही या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी अथवा क्रीडासंकुल समितीला दिलेला नाही. त्यामुळे आजही हा जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव अपूर्ण अवस्थेतच आहे.
शूटिंग रेंजचे साहित्यच नाही१० मीटर, २५ मीटर आणि ५० मीटर अशी परिपूर्ण शूटिंग रेंज बांधून तयार आहे. साहित्य खरेदीचा निधी मंजूर आहे. रक्कमही आंतरराष्ट्रीय कंपनीस अदा केली आहे. मात्र, या इमारतीत अद्यापही नेमबाजीचे साहित्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, अनुष्का पाटील, जान्हवी पाटील, तेजस्विनी सावंत, शाहू माने, आदी नेमबाज मंडळी पुणे, मुंबई येथे सराव करीत आहेत. यासह नवोदितही मिळेल त्या ठिकाणी सराव करीत आहेत.तालुका क्रीडा संकुलांची स्थिती अर्धवटचराज्य शासनाच्या क्रीडा खात्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.इतक्या अपुºया निधींमध्ये काही ठिकाणी वॉल कंपौंड, बास्केटबॉल मैदान, बहुउद्देशीय हॉल इतकेच बांधकाम होऊ शकले आहे.अपुºया निधीमुळे काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. करवीर तालुक्यातील बाचणी येथे क्रीडासंकुल मंजूर आहे.या ठिकाणी आराखडा व निधी मंजूर आहे. मात्र, कामास सुरुवात नाही. निगवे दुमाला येथे कामपूर्ण आहे.त्यात २०० मीटर धावणमार्ग, बहुउद्देशीय हॉल, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे, तर हातकणंगले तालुक्यातही दोन ठिकाणी क्रीडा संकुले मंजूर आहेत.त्यातील काही ठिकाणी अपुºया निधीमुळे काम अर्धवट आहे. चंदगड तालुक्यात मैदान अपूर्ण, तर बहुउद्देशीय हॉलपूर्ण आहे.गडहिंग्लज येथे निधी व आराखडा मंजूर आहे. कामास सुरुवात नाही. राधानगरी येथे संरक्षक भिंत, बहुउद्देशीय हॉल तयार आहे, तर २०० मीटर धावणमार्गाचे काम अपूर्ण आहे.शाहूवाडी तालुक्यात संकुलाचे कामही अर्धवट आहे. आजरा तालुुक्यासाठीही संकुल मंजूर आहे. जागा हस्तांतरणही झाले आहे. त्यातील झाडे व जमीन सपाटीकरण करण्यातच आतापर्यंतचा वेळ खर्ची गेला आहे. गगनबावडा येथेही संकुल मंजूर आहे; मात्र कामास सुरुवात नाही.चौकशीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताचांगले काम करून लवकरात लवकर हे संकुल सर्व प्रकारच्या खेळांसाठी खुले करावे याकरिता अनेक संघटनांनी या कालावधीत अनेक आंदोलने केली.मात्र, लालफितीच्या कारभारामुळे कधी कच्च्या मालाचे दर वाढले म्हणून ठेकेदाराने काम बंद केले, तर कधी साहित्य आले नाही म्हणून हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यासह शूटिंग रेंजसाठी लागणारे नेमबाजीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य अद्यापही या संकुलात पोहोचलेलेच नाही.जलतरण तलाव व डायव्हिंग तलावही अपूर्ण अवस्थेत आहे. जलतरण तलावात संकुलाच्या बाजूने जाणाºया ओढ्यातील अशुद्ध पाणी मिसळते. त्यामुळे हा तलाव अद्यापही पूर्ण झालेला नाही.या सर्व कामाची त्रयस्तमार्फत चौकशी करावी म्हणून आमदार चंद्रदीप नरके व आमदार प्रकाश आबिटकर यांनी जुलै २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात मागणी केली होती. त्यात राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक बोलाविण्याचे विधानसभेत जाहीर केले होते; पण हिवाळी अधिवेशन आले तरी ही बैठक काही झालेली नाही.फुटबॉलप्रमाणे हॉकीतही कोल्हापूर अग्रेसरकोल्हापूर जशी फुटबॉलपंढरी आहे, तशीच हॉकीतही आहे. यात गडहिंग्लज तालुक्यातील सामानगडाच्या पायथ्याशी असणाºया नूलचा दबदबाही राज्यासह देशभरात आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना हे गाव हॉकीला समर्पित झाले आहे. आजच्या घडीला या गावातील २० पेक्षा अधिक हॉकीपटू राज्याच्या हॉकीत कार्यरत आहेत. हॉकीचे गाव म्हणून स्पोर्टस् अॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईने या गावात दहा वर्षांपूर्वी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डे बोर्डिंग स्कूल सुरू केले. त्यामुळे येथील हॉकी देशभरात पोहोचली आहे. हे गाव म्हणजे हॉकीची खाण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या गावासह कोल्हापूर शहरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथेही अॅस्ट्रोटर्फची गरज आहे. यातील ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर टर्फ मंजूर झाले आहे. मात्र, अद्यापही कार्यवाही नाही.ही मैदाने म्हणजे उजाड माळखो-खो, कबड्डी ही मैदाने म्हणजे उजाड माळरान आहे. त्याकरिता एक लाख ५९ हजार २३९ इतका खर्च केलेला आहे, तर व्हॉलिबॉल क्रीडांगणासाठी ११ लाख ८७ हजार १०४ इतका खर्च केला आहे. या मैदानात केवळ लोखंडी जाळी दिसते. ४०० मीटर धावणमार्ग (सिंथेटिक पद्धतीचा) करण्यात आला आहे. याकरिता ६५ लाख ९७ हजार ५०१ रुपये खर्च केले आहेत. मात्र, सद्य:स्थितीत हा ट्रॅक खरोखरच सिंथेटिक आहे का, असा सवाल धावणाऱ्या धावपटूंना पडत आहे.
कोल्हापूरने राज्याला तसेच देशाला अनेक कबड्डीपटू दिले आहेत. तरीही कोल्हापुरात कबड्डीसाठीचे अत्याधुनिक इनडोअर मैदान नाही. त्यामुळे अनेक स्पर्धा कोल्हापूर सोडून अन्य शहरांत भरविल्या जात आहेत. त्यातून खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने खास बाब म्हणून कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलात इनडोअर कबड्डी स्टेडियम नव्याने बांधावे. विशेषत: क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी प्राधान्याने विचार करावा.- दीपक पाटील, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक, शिरोली
गेल्या दोन वर्षांपासून जलतरण तलाव, शूटिंग रेंज, अंतर्गत सुविधा, पाणी, वीज, चेंजिंग रूम हे पूर्ण करून खेळाडूंकरिता खुली करावीत या मागणीसाठी सातत्याने मी पाठपुरावा करीत आहेत. २०१० पासून संकुुलात झालेल्या सर्व कामांची त्रयस्त तज्ज्ञ एजन्सीमार्फत तपासणी व चौकशी करावी. त्यात कामाचा दर्जा, झालेला खर्च, आदींची चौकशी व्हावी. खर्ची पैसा आणि झालेले बांधकाम यात गफलत आहे. त्यामुळे क्रीडासंकुलातील दोषींवर कारवाई करावी.- सुहास साळोखे, माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू