कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे बालरसिकांसाठी ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्रीदेवी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी दाखवून श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली.चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत २१ आणि २२ फेब्रुवारी या कालावधीत महानगरपालिकेतील विद्यार्र्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दर महिन्याला मोफत बालचित्रपट दाखविण्याच्या योजनेअंतर्गत या महिन्यात ‘टर्बो’ हा चित्रपट दाखविण्यात आला.शर्यतीच्या वेडानं झपाटलेल्या थिओ या गोगलगायीच्या इच्छाशक्तीचा आणि तिला मदत करणाऱ्या टर्बो या गाडीच्या एक शक्तिशाली इंजिनाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. थिओ ते टर्बो हा गोगलगायीच्या शर्यतीवर आधारित प्रवास बालरसिकांनी पाहिला.अभिनेत्री श्रीदेवी याच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या बालचाहत्यांनाही मोठा धक्का बसला. शाहू स्मारकमध्ये चिल्लर पार्टीतर्फे ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यापूर्वी श्रीदेवी यांनी अभिनित केलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटातील कॉकटेल गाणे बालरसिकांना दाखविण्यात आले. यावेळी श्रीदेवीला आदरांजली वाहण्यात आली.या चित्रपटाला सुधाकर जोशी नगर येथील झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा मोठा गट उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद यादव यांच्यासह शिवप्रभा लाड, अभय बकरे, रवि शिंदे, अनिल काजवे, मिलिंद नाईक, गुलाबराव देशमुख यांनी केले.