कोल्हापूर : कलाकृती घडवताना कलाकार मानवीमुल्य जपण्याबरोबरच कुंचल्याच्या माध्यमातून समाजामधील जागल्याची भूमिका पार पाडतो.प्रबोधनाबरोबरच प्रसंगी अपप्रवृत्तींच्या विरुध्द आवाजही उठवतो.अनेक शब्दांचे काम त्यांची एक कलाकृती लीलया पार पडते असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनच्या कलादालनात दळवीजच्या वार्षीक प्रदर्शनास प्रारंभ विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते तसेच जेष्ठ चित्रकार प्रा.जी.एस. माजगांवकर, श्यामकांत जाधव, प्रा. अस्मिता जगताप, प्रा. सरिता माने, अध्यक्ष अर्चना अंबिलढोक, विजयमाला मेस्त्री, विजय टिपुगडे मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.याप्रसंगी शिवमुद्रेचा संदर्भ देत विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिपदेच्या चंद्राच्या कले प्रमाणे कलाकाराच्या कला वृद्धिंगत होत जातात हा आशावाद मांडला. उपस्थित कलाकारांचे कौतुकही केले.यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य जी.एस.माजगावकर यांनी कलाकाराने कलेची मुल्ये अंगीकारताना मूळ विसरता कामा नये. आजच्या पिढीकडे संगणकीय क्रांतीमुळे जगभरातील कलाकारांना अभ्यासता येते. त्याचा उपयोग त्यांनी कालानिर्मितीसाठी करावा,असे सुचविले. सकारात्मकता कलाकाराला नवी दिशा देऊ शकते.असे मत व्यक्त केले. यावेळी विध्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला.
प्रदर्शनासाठी गिरीष उगळे, संजय गायकवाड, दीपक कांबळे, प्रवीण वाघमारे, अभिजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. भूषण घोलप,पंकज कापसे, दीक्षा देसाई या यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. हे प्रदर्शन गुरूवार (दि.१५) पर्यंत सकाळी नऊ ते रात्री आठ यावेळेत पाहण्यासाठी खुले राहिल. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.