कोल्हापूर : ‘राजारामियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि श्रमदानातून राजाराम महाविद्यालयात विविध वृक्षांचा ‘आॅक्सिजन पार्क’ साकारण्यात येत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याची सांगता आणि दुसर्या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.‘माजी राजारामियन्स ग्रुप’तर्फे सन २०१६ पासून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवीत येत आहेत. त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात आॅक्सिजन पार्क साकारण्याचे काम जूनमध्ये सुरू केले. या पार्कच्या पहिल्या टप्प्यात बेल, पिंपळ, वड, उंबर, सोनचाफा, बहावा, कांचन, आपटा, पळस, नारळ, आंबा अशा विविध ५५० वृक्षांचे रोपण केले आहे.
या पहिल्या टप्प्यातील वृक्षारोपणाची सांगता आणि दुसर्या टप्प्याचा प्रारंभ खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘माजी राजारामियन्स ग्रुप’तर्फे साकारण्यात येत असलेल्या आॅक्सिजन पार्कसह अन्य उपक्रमांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘माजी राजारामियन्स’ यांचा हा पर्यावरणपूरक उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमास राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर, रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश गुरव, कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे, धीरज पाटील, विजयकुमार माने, सुभाष माने, आशिष कोरगावकर, अमोल कुलकर्णी, शशिकांत पाटील, हेमंत पाटील, श्रीकांत सावंत, शशांक पाटील, दीपक जमेनिस, अंजली पाटील, सुनील धुमाळ, जब्बीन शेख, अर्पणा पाटील, रिमा शेळके-पाटील, आशिष घेवडे, दिलावर महात, अविनाश मिरजकर, डॉ. प्रवीण कोडोलीकर, मिलिंद दीक्षित, आदी उपस्थित होते.दुसर्या टप्प्यात हे होणारशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या मागील परिसरातील दीड एकर परिसरातील या पार्कच्या पहिल्या टप्प्यात ज्या वृक्षांचे रोपण केले आहे. त्यांच्या जतन, संगोपनासह या वृक्षांसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरविले जाणार असल्याचे ‘माजी राजारामियन्स ग्रुप’च्या शशिकांत पाटील यांनी सांगितले.