कोल्हापूर : गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांच्या शर्यतीमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन २०१५ पासून तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.पुलाच्या उर्वरित कामाचा ठेका आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला दिला. पुलाच्या पाणी पातळीच्या चुकीच्या मोजमापावरून वाद उफाळला; त्यामुळे त्यातून हे काम रखडले होते. त्यानंतर पावसामुळे नदीला पूर आल्याने हे काम पूर्णपणे थांबले.दरम्यान, आता पावसाच्या पुराची भीतीही दूर झाली आहे, तरीही पुलाचे काम सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरचा मुहूर्त उघडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या कामावरील कर्मचारी येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहत आहेत.
तीन महिन्यांत काम पूर्णजिल्हा प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदाराला पुलाच्या कामाची वर्क आॅर्डर दिली. काम २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अट आहे; पण नदीच्या पुरामुळे वेळ वाढल्याने हे काम ३१ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून पूल रहदारीस खुला करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराने ठेवले आहे.