कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलातर्फे शहरातील गणेश तरुण मंडळांच्या विविध परवानग्यांसाठी जुना बुधवार पेठेतील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे.गणेश तरुण मंडळांना गणेश प्रतिष्ठापना, लाउड स्पीकरचा वापर व विसर्जन मिरवणुकीचा परवाना असे वेगवेगळे परवाने घेणे बंधनकारक आहे. त्याकरिता परवानगी मागणी अर्ज करावा लागतो. यासाठी परवानगी अर्ज १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपलब्ध करण्यात आले आहेत.
सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विनामूल्य परवानगी देण्यात येणार आहे. सदरचा परवाना फॉर्म मंडळाच्या अध्यक्षांनी येथे संपूर्ण माहिती भरून द्यावा. त्यांना मंडळाचा परवाना उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत कोणत्या दिवशी व वेळी देण्यात येणार आहे., याबाबत परवानगी अर्ज दिल्यानंतर तारीख व वेळ देण्यात येणार आहे.तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका व शहर वाहतूक शाखेकडील परवान्याकरिता या कार्यालयाकडील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.