कोल्हापूर : वृद्धाश्रमात वयोवृद्धांची होणारी घुसमट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बालमजुरी, पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांचे भावविश्व अशा अवघड प्रश्नांचे स्वत:च्या बुद्धीने आकलन करून ते अभिनयाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या बालचमूंच्या सादरीकरणाला सलाम करीत गुरुवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला. पुण्यातील स्पर्धा संपल्यानंतर साधारण २२ तारखेपर्यंत या स्पर्धांचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.केशवराव भोसले नाट्यगृहात गेल्या सात दिवसांपासून रंगलेल्या १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप रात्री आठ वाजता महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली या संस्थेने सादर केलेल्या ब्लू व्हेल आणि व्हाईट रोझेस या नाटकाने झाला.यात वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांच्या वेदना, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गोष्टींच्या अभावात जगणारी झोपडपट्टीतील मुले, बंद गलीतून अन्नासाठी धडपडणाऱ्या बालमजुरांची उत्तररात्रीची कहाणी, योग्य संगोपन न झालेल्या बालकांच्या आयुष्याला लागलेले वळण, रिअॅलिटी शोचे आकर्षण आणि त्यात होरपळणारे बालपण, विज्ञानाशी मैत्री, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यावर बालमनाने शोधलेले उपाय, ब्लू व्हेल गेम अशा विविध विषयांवर भाष्य करण्यात आले.स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चिंगी (आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान, इचलकरंजी), अशी एक परिकथा (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा), बंद गली (अखिल भारतीय नाट्य परिषद, मिरज), चम चम चमको (आजरा हायस्कूल, आजरा), न्याय हवा, न्याय (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), बिल्कूची गोष्ट (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ), हिरवी बाभळ (आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ), देवबाभळी (देवल स्मारक मंदिर, सांगली) ही नाटके सादर झाली.कोल्हापूर केंद्रानंतर आता पुणे केंद्रात प्राथमिक फेरी होणार आहे. ही स्पर्धा १९ तारखेला संपल्यानंतर २२ तारखेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशांत जोशी व मिलिंद अष्टेकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले.