कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या निधीपैकी जुलैअखेर २९.७४ टक्के इतका निधी खर्च करून ‘कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांका’वर आला आहे. कार्यान्वयीन यंत्रणांनी निधी खर्च करण्यासाठी आवश्यक मान्यता मिळण्यासाठी व्यक्तिश: पाठपुरावा करावा तसेच लोकप्रतिनिधींही शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी त्यांचे स्वत:चे केडर असावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, सतेज पाटील, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ‘ओटीएसपी’च्या ३२९ कोटी ११ लाख रुपयांच्या आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २२६ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी १०० कोटी ८१ लाख आणि ‘ओटीएसपी’साठी १ कोटी ८० लाखांचा अर्थसंकल्पीय निधी आहे. त्यामध्ये शासनाकडून सर्वसाधारण योजनेसाठी २२६ कोटी ५० लाख रुपये, विशेष घटक योजनेमध्ये २५ कोटी २७ लाख ९४ हजार, ‘ओटीएसपी’अंतर्गत १ कोटी ४५ लाख ६८ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात जुलैअखेर सर्वसाधारण योजनेमध्ये ६७ कोटी ३४ लाख व विशेष घटक योजनेत १८ कोटी ७८ लाख रुपये खर्च झाला आहे. अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चाची टक्केवारी अनुक्रमे २९.७४ आणि १८.६३ टक्के आहे. बीडीएसनुसार जिल्हा सर्वसाधारण योजनेमध्ये २९.७४., विशेष घटक योजनेत १८.६३ टक्के, तर ओटीएसपी योजनेत ३.३२ टक्के खर्च करून कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी निधी खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्याची वाट न पाहता सुरुवातीपासूनच त्याचे नियोजन करावे व निधी खर्च करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व यंत्रणांनी खर्चाचे नियोजन केले आहे.जनतेला विश्वासात घेऊन शिवार अभियान राबवायावर्र्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात २० गावांमध्ये हाती घेण्यात आली. याशिवाय ज्या गावांत हे अभियान राबविण्याची आवश्यकता आणि लोकांची इच्छा आहे, तेथे मागणीनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. त्यासाठी विविध कंपन्यांची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाअवयवदान अभियानात सहभागी व्हा डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लिहा यांसारख्या अवयवांची निसर्गाने आपल्याला अमूल्य भेट दिली आहे. आपल्या मृत्यूनंतर हे अवयव इतर रुग्णांना जीवदान देऊ शकतात. यासाठी राज्य शासनानेही ३० आॅगस्ट व १ सप्टेंबर या दिवशी महाअवयवदान अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. समर्पित निधी अन्य कामांवर खर्च होणारकृषी, आयटीआय, जिल्हा ग्रंथालय, कौशल्य विकास, सीपीआर आणि प्री- आयएएस ट्रेनिंग सेंटर, आदींनी त्यांच्याकडील निधी विविध कारणांनी समर्पित केल्याने सुमारे ५ कोटी ८१ लाख रुपयांचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तर ८३ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची विविध विकासकामांसाठी जादा मागणी प्राप्त झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
निधी खर्च करण्यात ‘कोल्हापूर राज्यात पहिले’
By admin | Published: August 26, 2016 11:52 PM