कोल्हापूर : राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार ‘गणवेश वितरण सोहळा’ व विविध नावीन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण ६ जानेवारी, २०१८ रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. दिवाकर रावते यांनी एस. टी.तील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना करून त्यांची तत्काळ अंमलबजावणी केली. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी’ या संस्थेला एस. टी. कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश ‘डिझाईन’ तयार करण्यास दिले.
या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टी.च्या कर्मचाऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधून, त्यांचे कामाचे स्वरूप, त्यांच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे डिझाईन केले. यांचे सादरीकरण सर्व कामगार व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींपुढे करण्यात आले.
यांच्या सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार त्यात आवश्यक ते बदल करण्यात येऊन सुधारित गणवेश ‘डिझाईन’ तयार करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातून दोन तयार गणवेश देण्यात येणार आहे.