कोल्हापूर : लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या देशातील शासन व्यवस्थेकडून विकासाच्या दृष्टीने पाऊल पडणे आवश्यक आहे. शिक्षण, औद्योगिक, व्यापार, आदी क्षेत्रांमध्ये नवतंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी गुरुवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे (वायसीएसआरडी) आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. वनस्पतिशास्त्र विभागाच्या निलांबरी सभागृहातील या व्याख्यानास ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार, अनिल पाटील प्रमुख उपस्थित होते.
राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव पाटील म्हणाले, जागतिक पातळीवरील उद्योग-व्यापारासह विविध क्षेत्रांतील स्पर्धा वेगाने तीव्र होत आहे. त्यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारताची फारशी चांगली तयारी नाही. नवसंशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याबाबतची उदासीनता, लोकशाही प्रक्रियेमुळे निर्णय घेण्यास होणारा विलंब, विकासाच्या प्रकल्पांना अनेकदा विनाकारण होणारा विरोध, विकासाची दृष्टी नसलेले नेतृत्व अशा विविध कारणांमुळे आपला देश जागतिक स्पर्धेत मागे पडला आहे.
आपल्याकडे क्षमता असूनही अशा स्वरूपाची वेळ आपल्यावर आली आहे. ते चित्र बदलण्यासह जगाला एक भक्कम, शाश्वत पर्याय म्हणून देशाला उभे करायचे असल्यास विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. उद्योग-व्यवसाय क्षेत्राने बदलते तंत्रज्ञान स्वीकारून कार्यान्वित झाले पाहिजे. मोठ्या उद्योगसमूहांनी आपल्या देशातच नवतंत्रज्ञान, संशोधन विकसित करण्यासाठी विद्यापीठांना दत्तक घेणे, संशोधन संस्था सुरू करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ‘वायसीएसआरडी’चे सहायक संचालक गजानन साळुंखे यांनी स्वागत केले. चेतन गळगे यांनी आभार मानले.
कौशल्यविकासाला प्राधान्य हवेनव्या पिढीने रेडीमेड नोकरी मागणे बंद करावे. शासकीय नोकऱ्यांच्या उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता, कौशल्यविकासाला प्राधान्य द्यावे. बदलते तंत्रज्ञान, गरजांनुसार कौशल्य आत्मसात करावे. त्यातून ज्ञानासह आर्थिक गरजदेखील पूर्ण होईल, असे पाटील यांनी सांगितले.
चीन स्पर्धक म्हणून पाहत नाहीकोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करा; पण त्यातील उत्पादन आमच्या देशातच तयार करून निर्यात करा, हे धोरण स्वीकारून चीनने उद्योग, व्यापार क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. विविध देशांत आपले साम्राज्य वाढविले आहे. ‘नवी ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणून हा देश पुढे येत आहे. आपल्या देशापेक्षा चीन खूप पुढे आहे. चीन स्पर्धक म्हणून भारताकडे पाहत नाही. गुंतवणुकीबाबतचे चीनसारखे धोरण आपण स्वीकारणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.