विषयच हार्ड... कोल्हापूरचा नाद करायचा नाय... आपलं कोल्हापूर जगात भारी. अभिमान आहे, मी कोल्हापूरकर आहे, अशीच भावना दुबईमधील एका पार्किंगमध्ये घेतलेल्या एका व्हिडीओतून प्रकट झाली आहे आणि या व्हिडीओला चांगलेच लाइक्स मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर तर सारे जग करतेच आहे, परंतु दुबईतील कोल्हापूरकरांनी आपल्या हृदयात असलेल्या शिवाजी महाराजांना त्यांच्या आलिशान गाड्यांवरही विराजमान केले आहे.दुबईतील व्हिडीओत एका पार्किंगमध्ये लागलेल्या सर्वांच्या सर्व गाड्यांवर शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले ‘श्रीमंत योगी’ असे लिहिलेले स्टिकर लावलेले आढळले. शिवरायांची ही अस्मिता त्यांनी परदेशातही अभिमानाने बाळगली आहे. अशा दुबईत सुमारे २५ गाड्यांवर शिवरायांचे स्टिकर लावलेले आहेत. मर्सिडीजचे मालक दिग्विजय चव्हाण, त्यांच्या पत्नी ऋतुजा, सचिन मंडलिक, रोहिणी पाटील, अमोल काटकर, हेमंत पाटील, शुभांगी पाटील, अमित चौगुले, मंजुषा चौगुले, मंगेश रेळेकर हे कोल्हापूरकर आपल्या आलिशान गाड्यांवरून शिवरायांची प्रतिमा असलेले हे स्टिकर अभिमानाने मिरवतात. अमोल काटकर सांगतात, परदेशातही यामुळे आमच्याकडे आदराने पाहतात. ओव्हरटेक करताना लाइट मारत नाहीत. मराठी माणूस अनोळखी असला, तरी ओळखीचा हात करतो, लाइट मारतो. कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर तर उखाण्यातही म्हणते, ‘शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्राचा कणा, हळदी कुंकवाच्या दिवशी मंगेशरावांचे नाव घेते, सगळ्यांनी एकदा तरी जय महाराष्ट्र म्हणा!’
नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल
By संदीप आडनाईक | Published: February 07, 2023 1:55 PM