कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त लोकराजाला मानवंदना देण्यासाठी आज शनिवारी (दि.6) सकाळी 10 वाजता अवघे कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध झाले. गत वर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. याठिकाणी जिल्ह्यातील सर्व आमदार, शासकीय अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन केले. यानंतर शाहूंप्रेमींनी दिलेल्या "श्री शाहू महाराज की जय ..!" या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.सकाळी ठिक 10 वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जाग्यावर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजाला मानवंदना दिली.
कोल्हापूर झालं 100 सेकंद स्तब्ध, लोकराजाला अनोखी मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 4:04 PM