कोल्हापूर : ग्रामीण परवाना धारकांना जिल्हा परमीट मिळाले पाहीजे. रिक्षाचालकांवरील हिटलरशाही खपवून घेतली जाणार नाही. रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावी. आदी मागण्यांसाठी मनसे वाहतुक सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांना निवेदन देण्यात आले.रिक्षा व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची गरजेनूसार कमी पैशात शहर व ग्रामीण भागात वाहतुक करीत आहबे. उच्च शिक्षित असूनही तरूणांनी बँकांकडून कर्जे काढून रिक्षा विकत घेतल्या आहेत.
त्यात ‘वाहतुकीचा बोजवारा ’ उडतो या नावाखाली रिक्षाचालकांवर शहर वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय विभाग कारवाई करीत आहे. त्यामुळे आदीच अर्थिक अडचणीत असलेला रिक्षाचालक हजारो रूपयांच्या दंडामुळे आणखी हवालदिल झाला आहे. वाहतुकीची कोंडी होण्यासाठी केवळ रिक्षाचालकांना जबाबदार धरले जाते.
इमारती बांधताना बिल्डर पार्किंगची जागा सोडत नाही. त्या ठिकाणी अन्य व्यवसाय सुरु केले जातात. अशा बिल्डरांंवर कारवाई करण्या ऐवजी रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई त्वरीत थांबवावी. ग्रामीण भागातून येणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली तर रिक्षाचालकांना कुटूंबियांसह आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही रिक्षाचालकांनी अधिकाऱ्यांना दिला.यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाळे यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण च्या येत्या बैठकीत याबाबत तोडगा काढला जाईल असे आश्वासन आंदोलक रिक्षाचालकांना दिले. तत्पुर्वी खानविलकर पेट्रोलपंपासून सुरू झालेला मोर्चा प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन देवून समाप्त करण्यात आला.यावेळी मनसे वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, राहूल पोवार, राजू बागवान, भरत चव्हाण, विक्रम पोवार, काका मोहीते, सलीम काझी, उमेश साळोखे, प्रकाश जौंदाळ, आबु घोरी, प्रविण चौगुले, अमोल पाटील, राजीव बागवान, श्रीकांत पाटील , असिफ शेख आदी उपस्थित होते.