कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत निवेदन दिले.शहरात सहा आसनी रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा होतो; म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षांवर खटले भरून ते प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जात आहेत. ५ ते १२ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.
पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीने रिक्षाचालक सुरेश पंदारे बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शहरातील रिक्षाचालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोरे यांच्याशी चर्चा केली. पोरे यांनी आज, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक व रिक्षाचालक निघून गेले.