कोल्हापूर : एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यांनाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या मार्गांवर धावणाºया एस. टी. बसेस शहरातील विनंती थांब्यांवरील प्रवाशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.महामंडळाच्या वतीने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोईसाठी विनंती थांबे उभे केले आहेत. मात्र चालक-वाहकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच; पण चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने तोट्यातील एस.टी. अधिकच खड्ड्यात रुतत आहे.बेळगाव, निपाणी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या मार्गांवरील अनेक गाड्या मंडळाने दिलेल्या विनंती थांब्यावर प्रवासी असूनसुद्धा थांबत नाहीत; तर प्रवाशांनी गाडी थांबविण्याची विनंती करूनसुद्धा गाडी थांबविली जात नाही. विशेषकरून टेंबलाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, आर.सी.सी. बिल्डर स्टॉप, उजळाईवाडी येथील उड्डाणपूल या परिसरांत अनेक प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा एस. टी. बसेस न थांबविता रिकाम्या घेऊन जाण्यात चालक व वाहकांना धन्यता वाटते. त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह वयोवृद्ध व महिला प्रवाशांना बसत आहे.
कर्नाटक गाडीला पसंतीहनुमानगर परिसर, ग्रीन पार्क, मोरेवाडी, आर. के.नगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे विनंती थांबा आहे. अनेकजण या ठिकाणी एस.टी.ची वाट पाहत थांबतात. प्रवाशांनी हात दाखवून विनंती करूनसुद्धा गाड्या थांबविल्या जात नाहीत. मात्र, कर्नाटकातील गाड्या थांबून प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे अनेकजण बेळगाव, निपाणीवरून येताना कर्नाटकच्या गाड्यांना पहिली पसंती देतात. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील एस. टी.ला प्रवाशांची अॅलर्जी आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे एस.टी. बसला हात दाखवूनसुद्धा बसेस थांबत नाहीत. तसेच बेळगाव, गडहिंग्लज व निपाणी येथून कोल्हापूरला येताना वाहकाला विनंती थांब्यावर गाडी थांबविण्याची विनंती करूनसुद्धा गाडी थांबविली जात नाही. मग विनंती थांबा दाखविण्यासाठी लावला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.- श्रीकांत भोसले, प्रवासी